पणजी, ३१ डिसेंबर (वार्ता.) : कांदोळी येथे एका क्लबमध्ये पार्टीच्या वेळी लावलेल्या संगीताच्या मोठ्या आवाजामुळे हृदयविकाराचा झटका येऊन या परिसरात रहाणार्या एका व्यक्तीचे निधन झाले. या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
प्राप्त माहितीनुसार २९ डिसेंबर या दिवशी कांदोळी येथील एका क्लबमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. नियमानुसार रात्री १० वाजल्यानंतर मोठ्याने संगीत लावले जावू शकत नाही; मात्र संबंधित क्लबने नियम धाब्यावर बसवून संगीत लावणे चालूच ठेवले. या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत संगीत चालूच होते. याविषयी सरकारी यंत्रणांकडे तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ध्वनीप्रदूषणामुळे अनेकांची झोपमोड झाली, तर एका व्यक्तीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. स्थानिकांच्या मते संबंधित क्लबने यापुढेही अशाच प्रकारचे संगीत कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे विज्ञापन प्रसिद्ध केलेले आहे.
(सौजन्य : Felly Gomes)
ध्वनीप्रदूषणामुळे विदेशी पर्यटकांनी मोरजी आणि आश्वे समुद्रकिनार्यांकडे फिरवली पाठ !
कासव संवर्धन मोहिमेमुळे मोरजी आणि आश्वे समुद्रकिनारे ‘शांत क्षेत्र’ म्हणून घोषित केलेले असले, तरी या ठिकाणी नाताळ आणि नववर्ष यांच्या स्वागताच्या प्रीत्यर्थ मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचे आयोजन केले गेले आहे. नियम धाब्यावर बसवून पहाटेपर्यंत या पार्ट्या चालत आहेत. यामुळे ‘शांत क्षेत्र’ घोषित केल्याचा नियम केवळ कागदावरच दिसून येत आहे. हल्लीच्या काळात ध्वनीप्रदूषणामुळे मोरजी आणि आश्वे समुद्रकिनार्यांकडे विदेशी पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. मोठ्या पार्ट्यांमध्ये देशी पर्यटकांची संख्या सुमारे ९० टक्के एवढी असते. यामध्ये देहली, पुणे आणि कोल्हापूर या भागांतील पर्यटक अधिक असतात.
‘सनबर्न’मध्ये एकूण १४४ महागडे भ्रमणभाष संच चोरीस
म्हापसा, ३१ डिसेंबर (वार्ता.) : २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत वागातोर येथील समुद्रकिनारी झालेल्या ‘सनबर्न’ महोत्सवात एकूण १४४ महागडे भ्रमणभाष संच चोरीस गेले आहेत.
प्राप्त माहितीनुसार या महोत्सवात पहिल्या दिवशी १४, दुसर्या दिवशी ५० आणि शेवटच्या दिवशी ८० महागडे भ्रमणभाष चोरीस गेल्याच्या तक्रारी हणजूण पोलीस ठाण्यात नोंद झाल्या आहेत. गतवर्षी या महोत्सवात ५०० भ्रमणभाष संच चोरीस गेले होते. पोलिसांनी ‘सनबर्न’मध्ये महागडे भ्रमणभाष चोरणारी टोळीही गजाआड केली आहे.