परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या खोलीत करण्यात आलेल्या ‘श्री दुर्गासप्तशती अनुष्ठाना’च्या संदर्भातील वैशिष्ट्यपूर्ण संशोधन !

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळून त्यांचे सर्व शारीरिक त्रास दूर व्हावेत आणि त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, म्हणून त्यांच्या निवासकक्षात (खोलीत) नवरात्रात श्री दुर्गासप्तशतीचे अनुष्ठान करण्यात येते. या अनुष्ठानात ‘सनातन पुरोहित पाठशाळे’तील पुरोहित परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत चौरंगावर श्री दुर्गादेवीचे चित्र ठेवून तिचे पूजन आणि श्रीदुर्गासप्तशती ग्रंथाचे पठण करतात. वर्ष २०१८ पासून परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनानुसार ‘श्री दुर्गासप्तशती अनुष्ठाना’च्या संदर्भात ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे विपुल संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनाच्या अंतर्गत अनुष्ठानाच्या कालावधीत (९ दिवसांत) श्री दुर्गादेवीचे चित्र, पठण करणारे पुरोहित, पूजेतील विभूती, निर्माल्य इत्यादी घटकांच्या चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. यातून लक्षात आलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पुढे दिली आहेत.

श्री दुर्गासप्तशती ग्रंथाचे संग्रहित छायाचित्र

१. अनुष्ठानातील ९ दिवसांत देवीच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ होणे

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

वर्ष २०१९ मधील अनुष्ठानापासून परात्पर गुरु डॉक्टरांनी अनुष्ठानातील ९ दिवसांत प्रतिदिन देवीच्या चित्राच्या पूजेपूर्वी आणि पूजेनंतर चाचण्या करण्यास सांगितले. या चाचण्यांतील निरीक्षणांतून लक्षात आले की, अनुष्ठानातील ९ दिवसांत देवीच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली. जानेवारी २०१९ ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत केलेल्या अनुष्ठानांतील पहिल्या दिवशी पूजेपूर्वी आणि नवव्या दिवशी पूजेनंतर देवीच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जेच्या नोंदी पुढे दिल्या आहेत. यातून लक्षात येते की, श्री दुर्गादेवीच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण उत्तरोत्तर वाढत गेले आहे.

२. एप्रिल २०२२ पासून केलेल्या अनुष्ठानात देवीच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जेत विलक्षण वाढ होणे

एप्रिल २०२२ मध्ये श्री दुर्गादेवीच्या चित्राच्या एक-आड-एक दिवस चाचण्या करण्यात आल्या. अनुष्ठानातील पहिल्या दिवशी देवीच्या चित्रात पूजेपूर्वी ९९.१६ मीटर सकारात्मक ऊर्जा होती आणि ९ व्या दिवशी पूजेनंतर ती १६२४.३५ मीटर झाली. पुढे ऑक्टोबर २०२२ आणि जानेवारी २०२३ मध्ये केलेल्या अनुष्ठानाच्या वेळी पहिल्या दिवशी पूजेपूर्वी देवीच्या चित्रात अनुक्रमे १५०८ मीटर अन् १९९२ मीटर सकारात्मक ऊर्जा होती आणि पाचव्या दिवशी ती २३३७ मीटरपेक्षा अधिक होती; पण जागेअभावी ती पूर्ण मोजता येणे शक्य झाले नाही. (त्यामुळे बाजूच्या स्तंभामध्ये वरच्या भागात दिलेल्या सारणीत ‘२३३७ पेक्षा अधिक’, असे लिहिले आहे.) यातून एप्रिल २०२२ पासून देवीच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जा विलक्षण वाढल्याचे लक्षात आले.

टीप – एप्रिल २०२२ मध्ये चैत्र शुक्ल प्रतिपदा ते चैत्र शुक्ल नवमी या कालावधीत पुरोहित साधक श्री. सिद्धेश करंदीकर, ऑक्टोबर २०२२ मध्ये आश्विन शुक्ल प्रतिपदा ते आश्विन शुक्ल दशमी या कालावधीत श्री. अमर जोशी यांनी आणि जानेवारी २०२३ मध्ये पौष शुक्ल अष्टमी ते पौष पौर्णिमा या कालावधीत श्री. ईशान जोशी यांनी पठण केले.

३. पुरोहितांनी त्यांच्या भावानुसार अनुष्ठानातील चैतन्य ग्रहण करणे

‘या अनुष्ठानांत सहभागी झालेल्या पुरोहितांवर अनुष्ठानाचा काय परिणाम झाला ?’, हे अभ्यासण्यासाठी पुरोहितांच्या एक-आड-एक दिवस चाचण्या करण्यात आल्या. त्यांची निरीक्षणे पुढे दिली आहेत.

टीप १ – या दिवशी अन्य एका पुरोहितांनी पठण केले. पठणापूर्वी त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ९.२५ मीटर होती आणि पठणानंतर ती २०.७० मीटर झाली.

टीप २ – या दिवशी श्री. सिद्धेश करंदीकर यांनी पठण केले. पठणापूर्वी त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ ३.८७ मीटर होती आणि पठणानंतर ती १०.८६ मीटर झाली.

वरील निरीक्षणांतून लक्षात येते की,

सौ. मधुरा कर्वे

३ अ. कोणताही विधी करतांना तो भावपूर्ण करणे आवश्यक ! : तीनही पुरोहितांमधील सकारात्मक ऊर्जेत प्रत्येक दिवशी पठणानंतर वाढ झाली; पण तिचे प्रमाण निरनिराळे आहे. ‘पुरोहितांची आध्यात्मिक पातळी, त्यांना आध्यात्मिक त्रास असणे किंवा नसणे, पठण करतांनाची त्यांच्या मनाची स्थिती आणि त्यांचा भाव इत्यादी घटकांवर ते एखाद्या विधीतील चैतन्य किती प्रमाणात ग्रहण करू शकतात ?’, हे अवलंबून असते. येथे लक्षात घेण्याचे महत्त्वाचे सूत्र, म्हणजे आध्यात्मिक त्रास असूनही भावामुळे देवीचे चैतन्य चांगल्या प्रमाणात ग्रहण करता येऊ शकते. यातून ‘पुरोहितांनी कोणताही विधी करतांना तो भावपूर्ण करणे किती महत्त्वाचे आहे’, हे लक्षात येते.

३ आ. कोणताही विधी भावपूर्ण करण्यासह देवतेकडून मिळालेले चैतन्य टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक ! : पहिल्या दिवशी पठणापूर्वी श्री. सिद्धेश करंदीकर यांच्यातील सकारात्मक ऊर्जा ४.४५ मीटर होती आणि नवव्या दिवशी पठणापूर्वी ती १०.८८ मीटर होती; म्हणजे त्यांनी देवीचे पूजन अन् पठण भावपूर्ण करण्यासह देवीकडून मिळालेले चैतन्य टिकवून ठेवले. यातून ‘कोणताही विधी भावपूर्ण करण्यासह देवतेकडून मिळालेले चैतन्य टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते’, हे लक्षात येते.

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२५.८.२०२३)

इ-मेल : [email protected]