Boycott Sunburn : सनबर्नसह गोव्यातील सर्व कार्यक्रमांमध्ये होणारे ध्वनीप्रदूषण रोखावे !

उच्च न्यायालयाचा गोवा सरकारला आदेश

पणजी : उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने सनबर्न कार्यक्रमाच्या वेळी होणार्‍या ध्वनीप्रदूषणावर लक्ष ठेवून राज्यात होणार्‍या सर्व कार्यक्रमांमध्ये ध्वनीप्रदूषण न होण्यासाठी नियमांचे पालन केले जाईल, याची दक्षता घेण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. मोरजी येथे ५, ८ आणि ९ डिसेंबर या दिवशी झालेल्या ध्वनीप्रदूषणासंबंधी तक्रारी आल्यानंतर न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.

नाताळ सणापासून ३१ डिसेंबरपर्यंत राज्यात विविध कार्यक्रम होतात. त्यातही उत्तर गोव्यातील समुद्रकिनारपट्टी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मोरजी समुद्रकिनारा परिसर ७ जानेवारी २०२१ या दिवशी ‘शांतता क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आला होता. मोरजी समुद्रकिनारा परिसर कासवांच्या प्रजननासाठीचे क्षेत्र असल्याने त्यासंबंधी काढलेल्या नोटिसीचे कठोर पालन करण्यात यावे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सनबर्नमध्ये व्यस्त असल्यावरून टीका

गोव्यात २८ डिसेंबरपासून सनबर्न इलेक्ट्रॉनिक संगीत महोत्सव चालू झाला आहे. या ठिकाणी १ सहस्र २०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. अमली पदार्थांना आळा घालण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहेत. राज्याचे प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सनबर्नमध्ये व्यस्त असल्याचा आरोप केला जात असून, हा महोत्सव सरकारचा अधिकृत महोत्सव असल्यासारखे वाटते,’ असे ‘९९ गोवा’ या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वापरकर्त्याने (‘युजर’ने) म्हटले आहे.

यामध्ये वापरकर्त्याने (युजरने) ‘सनबर्नच्या तिकिटांचा काळा बाजार होत असून महोत्सवात पाण्याची बाटली ३०० रुपयांना विकली जात आहे’, असा उल्लेख केला आहे.