नवी देहली – ‘न्यूजक्लिक’ या वृत्तसंकेतस्थळावर भारतविरोधी प्रचार करण्यासाठी चीनकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी वृत्तसंकेतस्थळाचा संस्थापक प्रबीर पुरकायस्थ आणि प्रमुख अमित चक्रवर्ती यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी अमित चक्रवर्ती याने माफीचा साक्षीदार बनायची सिद्धता दाखवली आहे. त्यासाठी त्याने स्वतःच न्यायालयात अर्ज केला आहे. ‘न्यूजक्लिक’ने चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचा प्रचार करणारा नेव्हिल रॉय सिंघम याच्याकडून ३८ कोटी रुपये मिळवले होते.
१. अमित चक्रवर्ती याने देहलीच्या पटियाला हाऊस न्यायालयात सांगितले की, चिनी हस्तकाकडून पैसे घेऊन आमच्या वृत्तसंकेतस्थळाने भारतविरोधी प्रचार केला. भारताच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण होईल, असे विचार पसरवले.
२. चक्रवर्ती आणि पूरकायस्थ यांना ३ ऑक्टोबर या दिवशी देहली पोलिसांनी अटक केली होती. याआधी पोलिसांनी देहलीत ठिकठिकाणी धाडी घातल्या होत्या. त्यानंतर या दोघांनी अटक करण्यात आली होती.
३. अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्सने ‘न्यूजक्लिक’ने केलेल्या या काळ्या कृत्याची प्रथम माहिती दिली होती. त्यानंतर हे प्रकरण उजेडात आले.
न्यूजक्लिककडून सनातन संस्थेविषयी विद्वेषी लिखाण !न्यूजक्लिकने वारंवार सनातन संस्थेच्या विरोधात लिखाण केले आहे. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण अथवा पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश हत्या प्रकरणांचे वृत्तांकन करतांना अनेक वेळा सनातन संस्थेला ‘न्यूजक्लिक’च्या वृत्तसंकेतस्थळावर ‘आतंकवादी संघटना’ असा उल्लेख करून संस्थेच्या विरोधात गरळओक करण्यात आली होती. ‘सनातन संस्था, तसेच अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या विरोधात जो दृष्प्रचार चालू होता, तोही चीनपुरस्कृत होता का ?’, याची चौकशीही भारतातील अन्वेषण यंत्रणांनी करणे आवश्यक ! |