तेल अविव (इस्रायल) – इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला आता ८० दिवस झाले असूनही हमासच्या आतंकवाद्यांनी अद्याप सर्व ओलिसांना सोडलेले नाही. यामुळे संतप्त झालेल्या त्यांच्या कुटुंबियांनी इस्रायली संसदेत पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या भाषणाच्या वेळीच गोंधळ घालण्यास आरंभ केला. या वेळी नेतान्याहू यांनी ‘सर्व ओलिसांच्या सुटकेसाठी पूर्ण प्रयत्न करणार’, असे आश्वासन दिले.
नेतान्याहू संसदेत भाषण देतांना म्हणाले की, ओलिसांच्या सुटकेच्या अभियानाला आणखी वेळ लागेल. त्या वेळी संसदेत उपस्थित त्यांच्या नातेवाइकांनी विरोध करण्यास आरंभ केला. या वेळी इस्रायली नागरिक म्हणाले की, युद्ध चालू होऊन ८० दिवस झाले आहेत. हा एकेक क्षण आमच्यासाठी नरकासमान गेला आहे. जर सरकारी नेत्यांच्या मुलांचे अपहरण केले गेले असते, तर तेव्हाही एवढा वेळ लागला असता का ? या वेळी पंतप्रधान म्हणाले की, ओलिसांच्या सुटकेसाठी कोणतीही कसर सोडणार नाही !
एकूण १२९ ओलीस, पैकी २२ ठार !
गाझा येथील हमासच्या आतंकवाद्यांनी ७ ऑक्टोबर २०२३ या दिवशी इस्रायलवर केलेल्या आक्रमणात अनेक लोकांचे अपहरण केले होते. त्यांपैकी अजूनही १२९ लोक त्यांच्या नियंत्रणात असून त्यांपैकी २२ ओलिसांना ठार करण्यात आले आहे, असे सांगितले जात आहे. उर्वरित १०७ जण त्यांच्या सुटकेची प्रतीक्षा करत आहेत.