Israel Hamas War: आतंकवाद्यांचा नायनाट होत नाही, तोपर्यंत युद्ध थांबणार नाही !

  • इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांची भूमिका ठाम !

  • ‘हमास’ आणि ‘इस्लामिक जिहाद’ या जिहादी संघटनांनी इजिप्तचा ‘गाझावर तिसर्‍या शक्तीने सत्ता स्थापित करण्या’चा प्रस्ताव फेटाळला !

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू

तेल अविव (इस्रायल) – ‘हमास’ आणि ‘इस्लामिक जिहाद’ या आतंकवादी संघटनांनी इजिप्तचा प्रस्ताव फेटाळला आहे. इजिप्तमध्ये हमास, इस्लामिक जिहाद आणि काही इस्रायली अधिकारी यांच्यामध्ये अनेक दिवस चर्चा चालू होती. गाझामध्ये कायमस्वरूपी युद्धविराम स्थापित करण्याचा या बैठकीमागील उद्देश होता. या वेळी दोन्ही संघटनांनी‘गाझाची सत्ता कुठल्यातरी तिसर्‍या शक्तीच्या हाती सोपवली, तर कायमस्वरूपी युद्धबंदी लागू केली जाईल’, या प्रस्तावावर दोन्ही आतंकवादी संघटनांनी अस्वीकृती दर्शवली. ही चर्चा होत असतांना इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गाझाला भेट दिली. या वेळी ते म्हणाले, ‘आम्ही पुन्हा हे स्पष्ट करू इच्छितो की, इस्रायली सैन्य येथून प्रत्येक आतंकवादी संघटनेचे वर्चस्व संपेपर्यंत हे युद्ध थांबवणार नाही.’

१. इजिप्तमध्ये झालेल्या वाटाघाटींच्या बैठकीत इजिप्त, तसेच कतार यांचे अधिकारीही सहभागी झाले होते.

२. दोन्ही आतंकवादी संघटनांसमोर ठेवलेल्या अटींमध्ये सर्व ओलिसांची तात्काळ सुटका करणे, याचाही समावेश होता.

३. ‘रॉयटर्स’ या जागतिक वृत्तसंस्थेशी संवाद साधतांना हमासच्या एका आतंकवाद्याने सांगितले की, इजिप्तचे लोक आमचे भाऊ आहेत; परंतु त्यांच्या अटी स्वीकारल्या जाऊ शकत नाहीत.

गाझातील शाळेतून शेकडो बंदुका, हातबाँब आणि १५ आत्मघातकी जॅकेट जप्त !

इस्रायली संरक्षण दलाने २५ डिसेंबर या दिवशी गाझातील दराज आणि तुफा भागांत धाडी घातल्या. या वेळी एका शाळेतून त्यांना आत्मघातकी आक्रमणात वापरली जाणारी घातक शस्त्रे आणि जॅकेट हाती लागले. या वेळी तेथे लपून बसलेल्या अनेक आतंकवाद्यांनाही अटक करण्यात आली.

या धाडीत शेकडो बंदुका, हातबाँब आणि १५ आत्मघातकी जॅकेट जप्त करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी या शाळेतून इस्रायली सैन्यावर क्षेपणास्त्रे डागण्यात आली होती. यात दोन इस्रायली सैनिक ठार झाले होते.