America Election : जो बायडेन यांनी हिंदूंचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता !

  • मे ते सप्टेंबर २०२४ मध्ये होणार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक !

  • डेमोक्रॅटिक पक्षाच्या अंतर्गत अहवालातील माहिती

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

न्यूयॉर्क (अमेरिका) – अमेरिकेत पुढील वर्षी होणार्‍या राष्ट्राध्यक्षपदाच्या  निवडणुकीसाठी नागरिकांच्या विचारांचा अभ्यास केला जात आहे. एकीकडे जो बायडेन यांनी हमास-इस्रायलच्या युद्धात इस्रायलचे उघडपणे समर्थन केल्याने अमेरिकी मुसलमान त्यांच्यावर अप्रसन्न आहेत, तर दुसरीकडे युक्रेन-रशिया युद्धातील अमेरिकेच्या भूमिकेचाही निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो. ही माहिती डेमोक्रॅटिक पक्षाच्या अंतर्गत अहवालात देण्यात आली आहे.

या अहवालानुसार व्हिस्कॉन्सिन, जॉर्जिया, पेन्सिल्व्हेनिया आणि एरिझोना या ४ राज्यांमध्ये हिंदूंना महत्त्वाचे मानले जाते. बायडेन यांना ५० कोटी डॉलर (अनुमाने ४ सहस्र १०० कोटी रुपये) जमा करायचे आहेत. यामध्येही हिंदू पुढे रहातील. हिंदू पारंपरिक दृष्टीने डेमोक्रॅटिक पक्षाचे समर्थक मानले जातात; परंतु गेल्या काही निवडणुकांत त्यांचा रिपब्लिकन पक्षाच्या बाजूने मते देण्याचा कल वाढला आहे.

डेमोक्रॅटिक सेनेटोरियल अभियान समितीचे प्रवक्ते टॉमी गार्सिया म्हणाले की, स्वत:ला पंतप्रधान मोदी यांचे मित्र सांगून विविध क्लृप्त्या लढवणार्‍या डोनाल्ड ट्रम्प यांनी काही भारतियांची मते प्राप्त करण्यात यश संपादन केले आहे. असे असले, तरी डेमोक्रॅटिक पक्षाने नेहमी हिंदूंच्या पाठिंब्याला महत्त्व दिले आहे. ते आमच्यासाठी प्रभावी मानले जातात. या दृष्टीकोनातून वर्ष २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांआधी बायडेन यांनी हिंदूंशी संपर्क साधणे आवश्यक आहे.

दुसरीकडे ‘अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी जॉर्जिया आणि व्हर्जिनिया या राज्यांतील हिंदुविरोधी प्रतिमा सुधारण्यासाठी मंदिरांना भेटी देणे आवश्यक आहे’, असे कॅलिफोर्नियातील एका डेमोक्रॅटिक नेत्याने सांगितले.

संपादकीय भूमिका

अमेरिकेतील कोट्यवधी हिंदूंनी आता स्वत:च्या मताचे महत्त्व लक्षात घेऊन प्रभावी दबावगट निर्माण करणे आवश्यक आहे ! ‘खलिस्तानी प्रवृत्तींना ठेचणार्‍या आणि भारताशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याचे धोरण अंगीकारणार्‍या पक्षालाच पाठिंबा देऊ’, असे अमेरिकेतील हिंदूंनी डेमोक्रॅटिक आण रिपब्लिकन पक्षांना निक्षून सांगितले पाहिजे !