उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी पुन्हा दिली परमाणू आक्रमणाची धमकी !

दक्षिण कोरिया आणि अमेरिका स्वत:चा बचाव करण्यासाठी करत आहेत प्रयत्न !

किम जोंग उन

प्योंगयँग (उत्तर कोरिया) – उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांनी पुन्हा एकदा परमाणू आक्रमणाची धमकी दिली आहे. ते म्हणाले की, त्यांच्या देशाचे धोरण असे आहे की, जर त्यांना चिथावले, तर ते परमाणू आक्रमण करण्यापासूनही मागे हटणार नाहीत. १८ डिसेंबर या दिवशी उत्तर कोरियाने ‘हवासॉन्ग-१८’ नावाच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केल्याचे सांगितले जात आहे. दक्षिण कोरिया आणि अमेरिका स्वत:चा बचाव करण्यासाठी प्रयत्न करत आहेत अन् त्यासाठी बैठका घेत आहेत, असा दावाही उन यांनी केला आहे.

सौजन्य DW News 

१. गेल्या वर्षी विदेशी विशेषज्ञांनी दावा केला होता की, उत्तर कोरिया जवळ आताही परमाणू क्षेपणास्त्रांना संचालित करणारी प्रणाली नाही. त्यामुळे तो परमाणू शस्त्रास्त्रांचा उपयोग करू शकणार नाही.

२. उत्तर कोरियाने नुकत्याच लांबच्या पल्ल्याच्या अंतर महाद्वीपीय क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले. उत्तर कोरियाची केंद्रीय वृत्तसंस्था ‘के.सी.एन्.ए.’ने सांगितले की, किम जोंग उन यांनी २० डिसेंबर या दिवशी क्षेपणास्त्र निर्मिती करणारे अधिकारी आणि सैनिक यांची भेट घेतली अन् त्यांना बॅलेस्टिक क्षेपणास्त्र ‘हवासॉन्ग-१८’च्या यशस्वी प्रक्षेपणावरून अभिनंदन केले.

गेल्या २ वर्षांत उत्तर कोरियाकडून तब्बल १०० क्षेपणास्त्रांचे परीक्षण !

गेल्या वर्षी उत्तर कोरियाने एक कायदा बनवला होता. त्यामध्ये उत्तर कोरिया कोणत्या परिस्थितीमध्ये परमाणू शस्त्रास्त्रांचा उपयोग करू शकतो, त्याचा उल्लेख केला आहे. यामुळेच तो गतीने परमाणू शस्त्रास्त्रे आणि त्यांच्याशी संबंधित क्षेपणास्त्रे यांचे परीक्षण करत आहे. वर्ष २०२२ पासून त्याने तब्बल १०० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचे परीक्षण केले आहे.