Dawood Ibrahim : दाऊद इब्राहिम याच्यावर कराचीमध्ये अज्ञाताकडून विषप्रयोग !

  • रुग्णालयात चालू आहेत उपचार !

  • भारतीय यंत्रणांकडून अद्याप दुजोरा नाही !

कुख्यात जिहादी आतंकवादी दाऊद इब्राहिम

नवी देहली – कुख्यात जिहादी आतंकवादी दाऊद इब्राहिम याच्यावर विषप्रयोग करण्यात आला असून त्याला पाकिस्तानच्या कराचीमधील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ‘त्याची प्रकृती चिंताजनक आहे’, असे म्हटले जात आहे. या संदर्भात पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांकडून वृत्त प्रसारित करण्यात आले आहे; मात्र याला पाकिस्तान किंवा भारताच्या अन्वेषण यंत्रणा यांनी कोणताही दुजोरा दिलेला नाही. पाकिस्तानमध्ये या वृत्तानंतर इंटरनेट बंद करण्यात आले आहे. त्यामुळे ‘ही घटना खरी असू शकते’, असा तर्क काढण्यात येत आहे. दाऊदला विष दिल्याची घटना २ दिवसांपूर्वी घडल्याचे म्हटले जात आहे. तो भरती झालेल्या रुग्णालयाच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तो रुग्णालयाच्या वरच्या मजल्यावर एकटाच असल्याचेही सांगण्यात येत आहे. या मजल्यावर केवळ त्याच्या कुटुंबातील सदस्य तिथे जाऊ शकतात. मुंबई पोलीसही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. दाऊदच्या मुंबईतील नातेवाइकांकडून माहिती गोळा करण्याचे प्रयत्न चालू आहेत.

दाऊद इब्राहिम भारताचा पसार आतंकवादी आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून त्याची माहिती देणार्‍याला २५ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. संयुक्त राष्ट्रानेही दाऊदला ‘जागतिक आतंकवादी’ घोषित केले आहे. दाऊद इब्राहिमने वर्ष १९९३ मध्ये मुंबईत साखळी बाँबस्फोट घडवले होते. या बाँबस्फोटांमध्ये २५७ जण ठार, तर ७०० जण घायाळ झाले होते.

पाकिस्तानची झाली आहे पंचाईत ! – अधिवक्ता उज्ज्वल निकम

या वृत्ताविषयी अधिवक्ता उज्ज्वल निकम म्हणाले की, आता पाकिस्तानची पंचाईत झाली आहे; कारण आतापर्यंत पाकिस्तानकडून परवेझ मुशर्रफ यांच्यासह सगळ्यांनी मोठ्या ठामपणे सांगितले होते की, दाऊद इब्राहिम पाकमध्ये रहात नाही. पाकिस्तानची खरी अडचण येथेच झाली आहे; कारण आता पाकिस्तान ‘दाऊदवर भारताने विषप्रयोग केला’ असा दावा करूच शकत नाही; कारण ‘दाऊद पाकिस्तानच्या भूमीत नाही’, ही अधिकृत भूमिका पाकिस्तानने घेतली होती.

पाकचे सैन्य आणि आय.एस्.आय. यांचाच कट असल्याची चर्चा !

पाकिस्तानमध्ये गेल्या काही मासांपासून भारतविरोधी जिहादी आतंकवाद्यांच्या गोळ्या झाडून किंवा विष देऊन हत्या केल्या जात आहेत. ‘या हत्या कोण करत आहे ?’, याची कोणतीच माहिती किंवा एखाद्या आरोपीला अटक करण्यात आली, असे काहीच समजू शकलेले नाही. त्यामुळे यामागे पाकचे सैन्य आणि गुप्तचर संघटना आय.एस्.आय. आहे, अशी चर्चा केली जात आहे. ‘या आतंकवाद्यांना पोसणे आणि त्यांना संरक्षण पुरवणे पाकिस्तानला परवडत नसल्याने त्यांचा काटा पाकिस्तान स्वतःच काढत आहे’, असे म्हटले जात आहे. ‘उर्वरित मोठ्या आतंकवाद्यांनाही पाक ठार करू शकतो’, असा दावा केला जात आहे. याविषयी भारतीय गुप्तचर यंत्रणांकडून आतापर्यंत कोणतेही विधान करण्यात आलेले नाही.