संस्कृत भाषेचे सौंदर्य : दुर्जनांचा संग नको !

दुर्जनेन समं सख्यं वैरं चापि न कारयेत्।
उष्णो दहति चाङ्गारः शीतः कृष्णायते करम्॥ – हितोपदेश, मित्रलाभ, श्लोक ८१

अर्थ : कोळश्याप्रमाणे असलेल्या दुर्जनाशी मैत्री आणि वैर दोन्ही करू नये; कारण कोळसा उष्ण असला, तर जाळतो आणि थंड असला, तर हात काळा करतो.

एका सैतानाने एका गरीब कष्टाळू शेतकर्‍याचा नाश करायचे ठरवले. त्याने शेतकर्‍यावर चोरीचा आळ यावा; म्हणून प्रयत्न केला; पण तो अपयशी ठरला. शेवटी त्याने त्या शेतकर्‍यासह मैत्री केली. त्याचा विश्वास संपादन केला. त्याला दारूचे व्यसन लावले. हळूहळू तो शेतकरी इतका बिघडला की, आपल्या कुटुंबातील लोकांना मारहाण करू लागला, त्याचा अंत झाला. सैतानाला शत्रुत्व करून जे करता आले नाही, ते त्याने मैत्री करून साधले; म्हणून दुर्जनासमवेत मैत्रीसुद्धा करू नये.