ASI Temples : भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या नियंत्रणातील सहस्रो मंदिरांमध्ये पूजेसाठी अनुमती द्या !

संसदीय समितीची केंद्र सरकारला सूचना

नवी देहली – सध्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या (‘ए.एस्.आय.’च्या) देखरेखीखाली असलेली देशभरातील सहस्रो मंदिरे आणि इतर धार्मिक स्थळे यांमध्ये पुन्हा पूजा चालू करण्याची अनुमती द्यावी, अशी सूचना वाहतूक आणि स्मारकांवरील संसदीय समितीने केंद्र सरकारला केली. वाय.एस्.आर्. काँग्रेसचे खासदार व्ही. विजय साई रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्य करत आहे. या समितीने ६ डिसेंबर २०२३ या दिवशी संसदेत मांडलेल्या ‘भारतातील संरक्षित स्मारके आणि स्मारकांच्या संवर्धनाशी संबंधित समस्या’ या अहवालात ही सूचना केली आहे.

१. समितीचे म्हणणे आहे की, देशाच्या विविध भागांत ए.एस्.आय.च्या नियंत्रणातील संरक्षित स्मारके किंवा मंदिरे आहेत, ज्यांवर लोकांची अपार श्रद्धा आहे. अशा स्थितीत त्यांना पूजा करू न देणे योग्य नाही. लोकांना पूजेचा अधिकार दिल्याने त्यांची इच्छा पूर्ण होईल.

२. ए.एस्.आय.ने सुरक्षेखाली नियंत्रणात घेतलेल्या स्मारकांमध्ये (मंदिर,मशीद आणि दर्गे) मोठ्या संख्येने अशी स्मारके आहेत, जिथे सध्या पूजा करण्याची अनुमती नाही. यामागे  ए.एस्.आयचा एक नियम असून या नियनुसार ए.एस्.आय. सध्या केवळ त्या स्मारकांमध्ये (ज्यामध्ये मोठ्या संख्येने मंदिरे आहेत) पूजा करण्याची अनुमती देतो, जिथे  ए.एस्.आय.कडे त्यांचे दायित्व येईपर्यंत पूजा चालू होती.

३. उदाहरणार्थ, ए.एस्.आय.द्वारे संरक्षित लाल किल्ल्याच्या आत असलेल्या मोती मशिदीत प्रार्थना करता येते; परंतु गुजरातमधील सिद्धपूर येथील रुद्र महालय मंदिरात पूजा करता येत नाही. त्याचप्रमाणे तमिळनाडूच्या महाबलीपूरम्मध्ये असलेल्या विजय चोलेश्‍वरम मंदिर आणि अशा अनेक धार्मिक स्थळांमध्ये पूजा करण्याची अनुमती नाही.

४. काही स्मारकांत पूजा करण्यास अनुमती दिली जाऊ शकत नाही. या जीर्ण झालेल्या स्मारकांचे संरक्षण करता यावे, यासाठी असे करत असल्याचे ए.एस्.आय.चे म्हणणे आहे.

५. ए.एस्.आय.च्या नियंत्रणात आलेल्या ज्या मंदिरांमध्ये किंवा अन्य धार्मिक स्थळांमध्ये पूजा केली जात नाही, त्यांना नव्याने अनुमती दिली जात नाही. आता या समितीने पर्यटन मंत्रालयाला यावर काम करण्यास सांगितले आहे. ‘या सूचनेची गांभीर्याने नोंद घेतली जाईल’, असेही पर्यटन मंत्रालयाने म्हटले आहे.

६. एका अहवालानुसार ए.एस्.आय. सध्या देशात ३ सहस्र ६९३ स्मारके सांभाळत आहे. यांपैकी २ सहस्र ८७३ मध्ये पूजा आणि नमाजपठण होत नाही; मात्र अनेक ठिकाणी स्थानिक लोकांच्या श्रद्धा या धार्मिक स्थळांशी जोडल्या गेल्या आहेत, त्यामुळे येथे पूजा करण्यास अनुमती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

७. जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनागमध्ये ८ व्या शतकात बांधलेले मार्तंड सूर्यमंदिर हे  ए.एस्.आय.ने पूजेला अनुमती न देण्याचे मोठे उदाहरण आहे. गेल्या वर्षी काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य झाल्यानंतर येथे पूजेस प्रारंभ झाला. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनीही येथे पूजा केली.

८.  ए.एस्.आय.ने या मंदिरात पूजा होत असल्यावर आक्षेप घेतला होता. ए.एस्.आय.ने जेव्हा पदभार स्वीकारला, तेव्हा येथे पूजा होत नव्हती, त्यामुळे ‘नव्याने पूजेला प्रारंभ करता येणार नाही’, असे त्यांनी सांगितले; मात्र आता या मंदिरात नियमितपणे पूजा केली जाते.

९. आता या समितीच्या सूचनांची कार्यवाही झाल्यास अनेक दशकांपासून आणि काही ठिकाणी शतकानुशतके पूजा केली जात नसलेल्या; परंतु त्यांचे धार्मिक महत्त्व मोठे असलेल्या मंदिरांमध्ये पुन्हा घंटा आणि टाळ यांचा आवाज ऐकू येईल.