लंडन – इतरत्र आश्रय शोधणार्या शरणार्थींना पूर्व आफ्रिकेतील देश असलेल्या रवांडामध्ये स्थलांतरित करण्याच्या कराराचा भाग म्हणून या वर्षी ब्रिटनने रवांडाला आणखी १० कोटी पॉऊंड (साधारण १ सहस्र कोटी रुपये) दिले आहेत. एप्रिलमध्ये हा निधी रवांडाला पाठवण्यात आला आहे, अशी माहिती ब्रिटनच्या गृहखात्याचे वरिष्ठ अधिकारी सर मॅथ्यू रायक्रॉफ्ट यांनी खासदारांना लिहिलेल्या पत्रात दिली. पुढील वर्षी आणखी ५ कोटी पॉऊंड (साधारण ५०० कोटी रुपये) पाठवणे अपेक्षित आहे.
सौजन्य स्काय न्यूज
या आठवड्यात ब्रिटनच्या स्थलांतरित खात्याच्या मंत्र्यांच्या त्यागपत्रानंतर पंतप्रधान ऋषी सुनक यांनी याविषयीची पूर्वीची योजना पुनरुज्जीवित करण्याचे आणि काम पूर्ण करण्याचे वचन दिल्यानंतर हा निधी देण्यात आला.
१. लोकांना छोट्या बोटीतून इंग्लिश खाडी ओलांडण्यापासून परावृत्त करण्यासाठी काही आश्रितांना पुनर्वसनासाठी रवांडा येथे पाठवण्याची योजना प्रथम एप्रिल २०२२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी घोषित केली होती; परंतु कायदेशीर आव्हानांमुळे त्याला विलंब झाला आणि आतापर्यंत ब्रिटनमधून आश्रितांना स्थलांतरित केले गेले नाही.
२. सरकारने याविषयीच्या धोरणात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला होता; मात्र सर्वोच्च न्यायालयाने ते अवैध ठरवले होते, असे सर मॅथ्यू यांनी सांगितले.