लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमध्ये अनुमाने ४० टक्के भारतीय डॉक्टरांना वर्णद्वेषी आणि भेदभावपूर्ण वागणुकीला सामोरे जावे लागत असल्याची माहिती एका संशोधनातून समोर आली आहे. याखेरीज या डॉक्टरांवर सहकार्यांकडून खोट्या तक्रारी आणि शारीरिक आक्रमणेही होत आहेत. रुग्ण भारतीय डॉक्टरांकडून उपचार घेण्यासही नकार देत आहेत, त्यांची पात्रता आणि क्षमता यांच्याविषयी शंका व्यक्त करत आहेत. ब्रिटनमध्ये सुमारे ३५ सहस्र भारतीय डॉक्टर आणि परिचारिका कार्यरत आहेत, जी परदेशी डॉक्टरांमध्ये सर्वांत मोठी संख्या आहे. ब्रिटीश मेडिकल असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, कामावर वर्णद्वेषाचा अनुभव घेतलेल्या ७० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी याविषयी तक्रार केलेली नाही.
१. विदेशात प्रशिक्षण घेतलेल्या २ सहस्रांहून अधिक भारतीय डॉक्टरांवर करण्यात आलेल्या संशोधनानुसार कामाच्या ठिकाणी वर्णद्वेषाच्या घटना प्रतिदिन घडत आहेत. बहुतेक डॉक्टर वर्णद्वेषाचे बळी आहेत; परंतु तक्रार करणे टाळत आहे; कारण त्यांना वाटते की, कोणतीही कारवाई केली जाणार नाही.
२. या संदर्भात भारतीय उच्चायुक्तालयातील एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले की, आम्ही भारतीय डॉक्टरांविरुद्धच्या वर्णद्वेषाच्या तक्रारी गांभीर्याने घेतो. हे अलीकडेच आमच्या निदर्शनास आले आहे आणि आम्ही ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेमधील (‘एन्.एच्.एस्.’मधील) सर्वोच्च अधिकार्यांकडे ते मांडण्याची सिद्धता करत आहोत.
३. राष्ट्रीय आरोग्य सेवेमधील १ लाख २३ सहस्र डॉक्टर आणि परिचारिका यांच्यापैकी सुमारे ४० टक्के भारतीय आहेत.
संपादकीय भूमिकाया संदर्भात भारत सरकारने ब्रिटनला आणि तेथे सध्या भारतीय वंशाचे पंतप्रधान असणारे ऋषी सुनक यांना या घटना थांबवण्यासाठी सांगणे अपेक्षित आहे ! |