अजित पवार यांची जीभ पुन्हा घसरली !

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधारी पक्षाकडून प्रथेप्रमाणे पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी एका पत्रकाराने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्या वाढलेल्या पोटाविषयी केलेला उल्लेख करत त्यावर प्रतिक्रिया विचारली. यावर अजित पवार यांनी ‘पोट वाढले, तर त्यात काय आहे ? पण मला दिवस गेलेले नाहीत’, असे अश्लाघ्य वक्तव्य केले. महिलांच्या गरोदरपणाविषयी सार्वजनिकरित्या उपहासात्मक आणि थट्टा-मस्करीने बोलणे हे शोभणारे नव्हे !

अजित पवार

१. …यातून काही धडा घेणार कि नाही ?

यापूर्वी वर्ष २०१३ मध्ये दुष्काळग्रस्त भागात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी उपोषण करणार्‍या शेतकर्‍याला उद्देशून अजित पवार यांनी सार्वजनिक सभेत असेच थट्टामस्करीत ‘पाणी नाही तर कुठून आणणार ? धरणात मुतू का ?’, असे अश्लाघ्य वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर अजित पवार यांच्यावर उपमुख्यमंत्रीपद गमावण्याची वेळी आली होती. शरद पवार यांच्या हस्तक्षेपामुळे कराड येथे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकाच्या ठिकाणी एक दिवसाचे उपोषणाचे प्रायश्चित्त घेऊन या प्रसंगातून अजित पवार थोडक्यात बचावले. या वक्तव्यावरून अजित पवार यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येण्याची स्थिती निर्माण झाली होती; परंतु या प्रसंगातून त्यांनी काही धडा घेतलेला दिसत नाही.

श्री. प्रीतम नाचणकर

२. ….अशांमध्ये जनहिताची भावना किती असेल ?

प्रश्न केवळ अजित पवार यांचा नाही, तर सत्तेत आल्यावर जनतेच्या भावनांचे सुवेरसुतक गमावलेल्या मग्रूरीने वागणार्‍या लोकप्रतिनिधींचा आहे. काही मासांपूर्वी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सौ. सुप्रिया सुळे यांना प्रसारमाध्यमांपुढे शिवी दिली होती. याच सत्तार यांनी काही मासांपूर्वी एका वरिष्ठ अधिकार्‍याने चहा घेण्यास नकार दिला; म्हणून ‘मग मद्य पिणार का ?’, अशी विचारणा केली. याला काय म्हणायचे ? असे वक्तव्य करणार्‍या कोणत्याही लोकप्रतिनिधीवर पक्षांतर्गत कारवाई केली जात नाही. त्यांना पाठीशी घातले जाते. ‘लाखो जनतेचे प्रतिनिधी’ म्हणून ही मंडळी निवडून येतात. ते इतके बेताल असतील, तर ते त्यांच्यामध्ये जनहिताची भावना किती असेल ? याची कल्पना येते.

मुळात वाढलेल्या पोटाविषयीचा प्रश्न पत्रकार परिषदेत सार्वजनिक वा व्यक्तीगतरित्या विचारणे, हे चुकीचेच आहे. यावरून प्रश्न विचारणार्‍या पत्रकाराचे वृत्तांकन जनतेच्या हितासाठी किती असेल, हा प्रश्नच आहे. भरकटलेली पत्रकारिता, भरकटलेली नेते मंडळी आणि त्यांना पुन्हा पुन्हा निवडून देणारी जनता, अशी आहे आपली लोकशाही !

– श्री. प्रीतम नाचणकर, नागपूर (८.१२.२०२३)