इस्रायल हमासच्या बोगद्यांमध्ये भूमध्य समुद्राचे सहस्रो घनमीटर पाणी सोडणार !

तेल अविव (इस्रायल) – इस्रायली सैन्य गाझामधील हमासच्या बोगद्यांमध्ये भूमध्य समुद्राचे पाणी सोडण्याच्या सिद्धतेत आहे. यासाठी गाझामधील अल्-शाती रुग्णालयाजवळ ५ मोठे पाण्याचे पंप बसवण्यात आले आहेत. असे वृत्त अमेरिकेतील ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ दैनिकाने प्रसिद्ध केले आहे. पंपांद्वारे प्रत्येक घंट्याला सहस्रो घनमीटर पाणी बोगद्यांमध्ये सोडले जाणार आहे. याविषयी अमेरिकाला यापूर्वीच कल्पना देण्यात आली आहे.

इस्रायलने गाझा येथील हमासच्या ‘कोर्ट जस्टिस पॅलेस’वर नियंत्रण मिळवले आणि तो उद्ध्वस्त केले. आतापर्यंत गाझामध्ये १५ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून यात अनुमाने हमासचे ५ सहस्र आतंकवादी आहेत.

बंदुकीच्या परवान्यांसाठी इस्रायलींची वाढती संख्या !

इस्रायलमध्ये बंदुकीच्या परवान्यांची मागणी अनेक पटींनी वाढली आहे. राष्ट्रीय सुरक्षामंत्री इटामार बेन गिवीर यांनी दिलेल्या माहितीनुसार ७ ऑक्टोबरनंतर २ लाख ६० सहस्र इस्रायली नागरिकांनी बंदुकीच्या परवान्यांसाठी अर्ज केले आहेत. गिवीर म्हणाले की, माझा प्रयत्न आहे की, अधिकाधिक इस्रायलींकडे संरक्षणासाठी शस्त्रे असावीत. सरकार अतिशय वेगाने काम करत असून आम्ही प्रतिदिन ३ सहस्र लोकांना बंदुकीचा परवाना संमत करत आहोत. यापूर्वी ते १०० पेक्षा अल्प होते.