रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे महिलांना किमान ८ मुले जन्माला घालण्याचे आवाहन !

मॉस्को (रशिया) – राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी रशियन महिलांना किमान ८ मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे. १० किंवा त्यापेक्षा अधिक मुलांना जन्म देणार्‍या रशियन महिलांना राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी १३ लाख रुपये देण्याची घोषणा केली. अशा प्रकारे पुतिन यांनी सोव्हियत काळातील म्हणजे वर्ष १९४४ मध्ये देण्यात येणारा ‘मदर हिरोईन’ पुरस्कार पुन्हा जिवंत केला आहे. १० किंवा त्याहून अधिक मुलांना जन्म देणार्‍या महिलेला हा पुरस्कार देण्यात येत होता. मॉस्कोमध्ये जागतिक रशियन पीपल्स कौन्सिलला संबोधित करतांना पुतिन म्हणाले की, पूर्वीच्या काळी मोठी कुटुंबे ही आदर्श होती. देशात तो काळ परत आला पाहिजे.

सौजन्य विऑन 

१. कोरोना महामारी, तसेच युक्रेनच्या विरोधातील युद्धामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट यांमुळे रशियन जन्मदर घसरत आहे. युक्रेनच्या विरोधातील मारल्या जाणार्‍या रशियन सैनिकांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे या देशाची लोकसंख्या अल्प होत चालली आहे.

२. युक्रेन युद्धामुळे अनुमाने ९ लाख लोकांना देश सोडून पळून जावे लागले. युक्रेनमध्ये लढण्यासाठी रशियन सैन्यात ३ लाख लोकांना भरती करण्यात आले आहे. त्यामुळे रशियामध्ये काम करणार्‍या लोकांची कमतरता निर्माण झाली आहे.

३. पुतिन म्हणाले, ‘‘रशियामधील प्रत्येकाने मोठ्या कुटुंबांना आदर्श केेले पाहिजे. कुटुंब हा केवळ राष्ट्र आणि समाज यांचा पाया नाही, तर ते नैतिकतेचे साधन आहे.’’