संस्कृत भाषेचे सौंदर्य !

धनाचे महत्त्व

ॐ कोन न याति वशं लोके मुखे पिण्डेन पूरितः।
मृदङ्गो मुखलेपेन करोति मधुरध्वनिम्।।

अर्थ : या जगात (पैसे) खाऊ घातल्यावर कोण आपलेसे होत नाही ? मृदुंगसुद्धा कातडीच्या मध्यावर कणकेचा गोळा चिकटवल्यावर (आपल्याला हवा तसा) गोड गोड ध्वनी काढू लागतो.


संपत्तीमुळे उद्भवणारे रोग

बधिरयति कर्णकुहरं वदनं मूकयति नयनमन्धयति।
कुटिलयति गात्रयष्टिं सम्पद्दोषोऽयमद्भुतो लोके।।

अर्थ : संपत्ती मनुष्याला बहिरा करते (गरिबांचे क्रंदन त्याला ऐकू येत नाही), तोंड बंद करते (तो सत्य गोष्टसुद्धा बोलून दाखवत नाही), डोळ्यांनी आंधळा करते (आपले दोष त्याला दिसत नाहीत) आणि अवयवही लुळे करते (कारण कष्ट करण्याची सवय नसल्याने रोग जडतात). या जगात असे हे संपत्तीचे रोग विस्मयकारक आहेत.


एखाद्याच्या अधीन रहाणे कष्टदायक !

शिरसा धार्यमाणोऽपि सोमः सौम्येन शम्भुना ।
तथापि कृशतां धत्ते कष्टः खलु पराश्रयः ।।

अर्थ : भगवान शंकराने चंद्राला डोक्यावर धारण केले आहे, तरी त्याला (प्रत्येक महिन्यात चंद्राच्या कलांमुळे) कृशता सोसावी लागते. खरोखर एखाद्याच्या अधीन रहाणे कष्टदायक असते.