संस्कृत भाषेचे सौंदर्य

विद्याधनाचे वैशिष्ट्य

न चोरहार्यं न च राजहार्यं न भ्रातृभाज्यं न च भारकारी ।
व्यये कृते वर्धत एव नित्यं विद्याधनं सर्वधनप्रधानम् ।।

(संदर्भ : अज्ञात)

अर्थ : विद्यारूपी धन चोर चोरून नेऊ शकत नाही. राजा हरण (जप्त) करू शकत नाही. भावाभावांत विद्येची वाटणी किंवा विभागणी करता येत नाही. विद्याधन भारभूत, म्हणजे जड होत नाही. ते खर्च कराल तेवढे वाढत जाते. असे हे विद्याधन सर्व धनांत श्रेष्ठ आहे.

श्री सरस्वतीदेवीचा अपूर्व कोष !

अपूर्वः कोऽपि कोशोऽयं विद्यते तव भारति ।
व्ययतो वृद्धिमायाति क्षयमायाति सञ्चयात् ।।

अर्थ : हे सरस्वतीदेवी, तुझा हा कोणता बरे अपूर्व कोष (ज्ञान) आहे, जो व्यय केला असता वाढतो आणि संचय केला असता क्षीण होतो ?

विवरण : ज्ञान हे इतरांना दिल्याने वाढते आणि ज्ञान घेण्याची इच्छा असणार्‍यांना ते न दिल्याने ज्ञानाचा लय होतो. ज्ञानाचा अपव्यय होऊ देऊ नका. ज्ञान देऊन अज्ञानांना ज्ञानी बनवा.

वृक्ष सत्पुरुषांसारखे असणे

छायां यच्छन्ति पान्थाय तिष्ठन्ति स्वयमातपे ।
फलानि च परार्थाय वृक्षाः सत्पुरुषाः खलु ।।

अर्थ : झाडे स्वतः उन्हात उभे राहून वाटसरूंना सावली देतात आणि आपली फळे दुसर्‍याला देतात. वृक्ष खरोखर सत्पुरुषासारखे असतात.