विनयभंगप्रकरणी उपवनसंरक्षक विजय माने निलंबित !

प्रतिकात्मक छायाचित्र

सांगली – सांगली जिल्ह्यातील एका महिला वनपरिक्षेत्र अधिकार्‍याचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी सांगली येथील तत्कालीन उपवनसंरक्षक (प्रादेशिक) आणि सध्या चंद्रपूर येथे कार्यरत असणारे उपवनसंरक्षक विजय माने यांना लैंगिक छळ कायद्यांतर्गत निलंबित करण्यात आले आहे. (महिला अत्याचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये संबंधित अधिकार्‍यांचे केवळ निलंबन होते. निलंबन झाले, तर ६ मास त्यांना निम्मे वेतन मिळते आणि बहुतांश अधिकारी ६ मासांनंतर परत कामावर उपस्थित होतात ! त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये कठोर आणि जलद शिक्षा होण्यासाठी प्रशासकीय स्तरावर पालट होण्याची आवश्यकता आहे ! – संपादक)

महिला अधिकारी कामाच्या निमित्ताने माने यांच्या कार्यालयात गेल्या असता माने यांनी त्यांचा विनयभंग केला होता. यानंतर महिला अधिकार्‍याच्या तक्रारीनंतर कुपवाड औद्योगिक वसाहत येथे ६ मे २०२२ मध्ये विजय माने यांच्यावर गुन्हा नोंद झाला होता. यानंतर मंत्रालयस्तरावर अतिरिक्त गृहसचिव सुजाता सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली ६ सदस्यांची चौकशी समितीही नेमण्यात आली होती. समितीने जून २०२३ पासून चौकशी प्रारंभ करून २५ सप्टेंबर २०२३ ला अहवाल सादर केला. यात माने यांना दोषी ठरवून कारवाईची शिफारस केली होती. त्यानुसार माने यांचे निलंबन करण्यात आले. माने यांच्याकडे असलेला चंद्रपुरातील उपवनसंरक्षकपदाचा कार्यभार मध्यचांदा येथील उपवनसंरक्षक यांच्याकडे देण्यात आला आहे. वनविभागाने एवढी गंभीर घटना घडूनही माने यांना निलंबित न करता केवळ स्थानांतर केल्याने चौकशी समितीने ताशेरे ओढले आहेत. (संबंधितांनी माने यांना पाठिशी घातले का ? त्यांचीही चौकशी करायला हवी ! – संपादक)