दुर्जनाशी मैत्री का करू नये ?
ॐ दुर्जनेन समं सख्यं प्रीतिं चापि न कारयेत् ।
उष्णो दहति चाङ्गारः शीतः कृष्णायते करम् ।।
अर्थ : दुर्जनाशी मैत्री, तसेच प्रेम करू नये. कोळसा फुललेला असला, तर जाळतो, तसेच तो थंड असला, तरी निदान हात तरी काळा करतोच.
आशेची आश्चर्यकारक शृंखला (बेडी)
आशा नाम मनुष्याणां काचिदाश्चर्यशृङ्खला ।
यया बद्धाः प्रधावन्ति मुक्तास्तिष्ठन्ति पङ्गुवत् ।।
अर्थ : आशा हे मानवाचे एक आश्चर्यकारक बंधन आहे. आशेने बांधलेला मनुष्य (तिच्या पूर्तीसाठी नेहमी) धावत असतो (जन्ममृत्यूचे फेरे फिरत असतो), तर तिच्यापासून मुक्त झालेले पांगळ्याप्रमाणे एका जागी स्थिर असतात.
योग्य निवड करण्याविषयी संत कालिदास यांनी केलेले विश्लेषण
‘पुराणमित्येक न साधु सर्वं न चापि काव्यं नवमित्यवद्यम् ।’
अर्थ : म्हणजे ‘जुने आहे; म्हणून ते सर्वच योग्य नसते आणि नवे आहे; म्हणून ते सर्वच त्याज्यही नसते’, असे संत कालिदास म्हणतात. कालिदासांचा रोख तत्कालीन समाजाच्या विचारसरणीवर होता. जुन्या कवींचे काव्य ते अत्युत्कृष्ट आणि (कालिदासांसारखे) नवखे कवी म्हणजे अतिनिकृष्ट असे समजणार्यांना कालिदास (उत्तरार्धात) म्हणतात की, सद्सद्विवेकबुद्धीने युक्त असे विद्वान मात्र या दोन्हींची (जुने आणि नवे यांची) परीक्षा करतात आणि योग्य त्याचीच निवड करतात.