ऑकलंड (न्यूझीलंड) – गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये न्यूझीलंडमधील तत्कालीन सरकारने तंबाखू आणि सिगारेट यांच्यावर बंदी घालणारा ऐतिहासिक कायदा केला होता. असे असले, तरी आताच्या नवीन सरकारने ही बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘यामुळे लोकांना करात सवलत मिळेल’, असे सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे ‘स्मोक फ्री’ नावाचा पर्यावरण कायदा रद्दबातल ठरणार आहे. या कायद्याच्या अंतर्गत वर्ष २००८ नंतर जन्मलेले लोक कोणत्याही प्रकारच्या धूम्रपानाची उत्पादने खरेदी करू शकत नाहीत.
सौजन्य चॅनल 4 न्यूज
१. या निर्णयाला देशातील डॉक्टरांनी मात्र विरोध दर्शवला आहे. ओटागो विश्वविद्यालयाचे प्रा. रिचर्ड एडवर्ड्स म्हणाले की, आम्ही हैराण आणि निराश झालो आहोत. हे पाऊल देशाला मागे नेणारे आहे.
२. न्यूझीलंडच्या तत्कालीन आरोग्य मंत्री आयशा वेरॉल यांनी हे मूळ विधेयक संसदेत मांडले होते. त्या वेळी त्या म्हणाल्या होत्या की, सहस्रावधी लोक आता दीर्घकाळ आणि चांगले आयुष्य जगतील. लोकांना धूम्रपानामुळे होणारे आजार आणि समस्या होणार नाहीत. यामुळे न्यूझीलंडच्या आरोग्य यंत्रणेचे २६ सहस्र ४०० कोटी रुपये वाचतील.
३. न्यूझीलंड हा अशा देशांपैकी एक आहे, जिथे लोक सर्वांत अल्प धूम्रपान करतात. सरकारी आकडेवारीनुसार तेथील केवळ ८ टक्के लोक प्रतिदिन धूम्रपान करतात.