‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’च्या विविध सत्रांत हिंदुत्वनिष्ठांनी मांडलेले उद्बोधक विचार !

वर्ष २०२१ मध्ये बंगालमध्ये झालेला हिंसाचार वर्ष १९४६ च्या मुसलमानांच्या ‘डायरेक्ट अ‍ॅक्शन डे’सारखा अमानुष ! – नूपुर शर्मा, मुख्य संपादिका, ‘ऑप इंडिया’

‘ऑप इंडिया’ या हिंदुत्वनिष्ठ वृत्तसंकेतस्थळाच्या मुख्य संपादिका नूपुर शर्मा यांनी ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’ला संबोधित केले. त्यांनी वर्ष २०२१ मध्ये बंगाल विधानसभेच्या निवडणुकांनंतर झालेल्या भयावह हिंसाचारावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, ‘‘वर्ष २०२१ मध्ये झालेला हिंसाचार हा वर्ष १९४६ च्या ‘डायरेक्ट अ‍ॅक्शन डे’सारखा अमानुष होता. त्या वेळी सामूहिक बलात्कार करून रस्त्यावर फेकून दिलेल्या पीडितांशी मी संवाद साधला. त्यांना अनेक दिवस मंदिरात आश्रय घ्यावा लागला होता. तृणमूल काँग्रेसच्या मुसलमान कार्यकर्त्यांकडून रस्त्यावरून चालत जाणार्‍या अल्पयीन हिंदु मुलींचे कपडे फाडले जात होते. आम्ही कुणीच या घटनांविषयी वाचा फोडू शकलो नाही; कारण कुणी पीडित व्यक्ती समोरच आल्या नाहीत. पोलिसांनीसुद्धा या घटनांवर गुन्हे नोंद केले नाहीत. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानेही कधी या पीडितांचे दु:ख समजून घेतले नाही. या पीडितांच्या साहाय्याला कुणीच धावून गेले नाही !’’

सौजन्य वर्ल्ड हिंदू कॉंग्रेस 

‘डीडी न्यूज’वरून राष्ट्रविरोधी विचारसरणीला आव्हान ठरणारी चर्चासत्रे चालू केली ! –  अशोक श्रीवास्तव, संपादक, ‘डीडी न्यूज’

अशोक श्रीवास्तव

‘डीडी न्यूज’चे वरिष्ठ संपादक अशोक श्रीवास्तव ‘प्रसारमाध्यमे त्यांचा धर्म बजावत आहेत कि नाही ?’ या विषयावर म्हणाले, ‘‘आधी ‘डीडी न्यूज’मध्ये चर्चासत्रांना स्थान नव्हते. त्यामुळे कोणत्याही विचारसरणीला आव्हान निर्माण करणारे प्रश्‍न आम्ही विचारू शकत नव्हतो. केवळ सर्वसाधारण रूपाने बातम्या प्रसारित करणे एवढेच आमचे काम होते. वर्ष २०१६ मध्ये तत्कालीन सूचना आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांची मी भेट घेतली. त्यांना म्हटले की, भारताच्या विरोधातील युद्धामध्ये राष्ट्रीय स्तरावरील प्रसारक वृत्तवाहिनी (सरकारी वृत्तवाहिनी) ‘दूरदर्शन’नेसुद्धा यामध्ये सहभाग नोंदवला पाहिजे आणि भूमिका निश्‍चित केली पाहिजे. डीडी न्यूजद्वारे राष्ट्रविरोधी विचारसरणींना आव्हान निर्माण केले पाहिजे. मला यासाठी अनुमती मिळाली आणि तेव्हापासून ‘डीडी न्यूज’वर चर्चासत्र चालू झाले. ‘डीडी न्यूज’साठी हा नवा प्रारंभ होता. या कार्यक्रमामुळे दूरदर्शनमध्ये पुष्कळ पालट झाले. (अशा प्रकारे राष्ट्रासाठी झटणारे अशोक श्रीवास्तव यांच्यासारखे राष्ट्रनिष्ठ संपादकच देशाची खरी शक्ती होत ! – संपादक)

भारत ही जगातील सर्वांत जुनी संस्कृती ! – विवेक अग्निहोत्री, चित्रपट निर्माते

विवेक अग्निहोत्री

भारत ही जगातील सर्वांत जुनी संस्कृती आहे आणि लोकशाही देश आहे. वर्ष २०२३ मध्ये हिंदुुविरोधी समुदायाकडून भारतियांना ‘काफिर’ संबोधणे, ‘सर तन से जुदा’ (शीर धडापासून वेगळे करणे) या घोषणांचा सर्रास वापर होत आहे आणि त्याला सामाजिक प्रसारमाध्यमांची मान्यता मिळणे, या घटना भयभीत करणार्‍या आहेत. एक कथाकार म्हणून त्यांना या विधानांची लाज वाटते. निवडणुकीचा काळ सोडला, तर राजकारणी हे प्रश्‍न उपस्थित करणार नाहीत. धर्मासाठी शतकानुशतके काम करणारे लोक भूमिगत झाले. यामुळेच हिंदूंच्या दुरवस्थेवर प्रकाश टाकणारे चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला, असे चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या भाषणात सांगितले.

२६/११ आक्रमणातून ‘हिंदु आतंकवादा’चे कथानक रचण्याचे होते षड्यंत्र ! – स्वाती गोयल शर्मा, वरिष्ठ संपादिका, ‘स्वराज्य माग’

‘स्वराज्य माग’ या हिंदुत्वनिष्ठ वृत्तसंकेतस्थळाच्या वरिष्ठ संपादिका स्वाती गोयल शर्मा यांनी ‘बनावट कथानकांना विरोध करणे, तसेच हिंदुद्वेषी घटनांना लपवण्यासाठी वापरण्यात येणार्‍या क्लृप्त्या’ या विषयावर विचार मांडले. ‘हिंदु आतंकवाद’ या नावाने रचण्यात आलेल्या षड्यंत्राच्या संदर्भात त्या म्हणाल्या, ‘‘वर्ष २००८ मध्ये मुंबईत झालेले २६/११ च्या आक्रमणाच्या वेळी ‘जिहादी आतंकवादी अजमल कसाब हा समीर चौधरी या हिंदु नावाने मरणार’, अशा प्रकारे कथानक रचण्यात आले होते. त्या वेळी वीरगती प्राप्त झालेले पोलीस अधिकारी तुकाराम आेंबळे यांच्यामुळेच हे कथानक फसले. अन्यथा कसाबच्या हत्येसह त्याचे खरे सत्य दडपून गेले असते आणि ‘हिंदु आतंकवाद’ या संकल्पनेला हातभार लागला असता.’’

सौजन्य वर्ल्ड हिंदू कॉंग्रेस 

अन्य एक उदाहरण देतांना शर्मा म्हणाल्या की, ‘उत्तरप्रदेशच्या कानपूरमध्ये ७ वर्षांपूर्वी रमेश शुक्ला नावाच्या एका हिंदु शिक्षकाची हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्यार्‍यांचा माग न लागल्याने पोलिसांनी ते प्रकरण बंद करून टाकले. प्रत्यक्षात ३ लोकांना इस्लामिक स्टेटमध्ये भरती व्हायचे होते. त्यांच्यात काफिराला मारण्याची क्षमता असल्याचे सिद्ध करण्यासाठीच त्यांनी टिळा लावलेले आणि हिंदु पेहराव असलेले शुक्ला यांची हत्या केली. त्यांनी बनवलेला हत्या करतांनाचा व्हिडिओ इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्यांना त्यांनी पाठवला होता. नुकत्याच एका प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या न्यायालयाने तिघांना मृत्यूदंडाची शिक्षा दिली. तेव्हा हे सत्य समोर आले.’

शीख पंथाची स्थापना हिंदु धर्माच्या रक्षणासाठी झाली होती ! – अनिलेश महाजन, उपसंपादक, इंडिया टुडे

भगतसिंह यांना हल्ली साम्यवादी म्हणून चित्रित केले जात असल्याच्या विषयावर बोलतांना ‘इंडिया टुडे’ या इंग्रजी वृत्तवाहिनीचे उपसंपादक श्री. अनिलेश महाजन म्हणाले की, भगतसिंह साम्यवादी नव्हते, हे आपल्यापैकी अनेकांना ठाऊक नाही. गेल्या ८०-९० वर्षांत असे एक कथानक रचण्यात आले की, त्यांच्या कारावासाच्या काळात ते साम्यवादी बनले होते; कारण त्यांच्यावर लेनिनचा प्रभाव पडला होता. हे या लोकांनी त्यांच्या सोयीनुसार निवडलेले कथानक आहे; कारण भगतसिंह केवळ एकच पुस्तक वाचत नव्हते, तर ५ पुस्तके वाचत होते. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे कार्य, महाराणा प्रताप यांचे जीवन, हीर-रांझा यांची कथा आणि लेनिन यांनी रशियन क्रांतीचे केलेले नेतृत्व इत्यादी पुस्तके वाचली होती. आपण हेसुद्धा समजून घेतले पाहिजे की, त्या वेळी साम्राज्यवाद्यांपासून देशाला मुक्त करू पहाणार्‍या साम्राज्यविरोधी शक्तींचा लेनिन हा नायक होता.

सौजन्य वर्ल्ड हिंदू कॉंग्रेस 

पंजाबमधील धर्मांतराविषयी बोलतांना श्री. अनिलेश महाजन म्हणाले की, पंजाबमध्ये धर्मांतर होत आहे हे उघड करण्यासाठी मी माझ्या व्यासपिठाचा वापर केला. एकेकाळी योद्धा समुदाय म्हणून ख्याती पावलेल्या शीख समुदायाने ख्रिस्ती पंथाचे कच्चे रूप धारण केले आहे. पंजाबमध्ये जाणूनबुजून एका मोठ्या शीख समुदायाला हिंदु धर्मापासून दूर नेण्याचा प्रयत्न चालू आहे. आम्हा सर्वांना ठाऊक आहे की, शीख पंथाची स्थापना हिंदु धर्माच्या रक्षणासाठी करण्यात आली होती. आता त्या राज्यात शिखांना हिंदु धर्मापासून दूर नेण्यासाठी एक मोठे षड्यंत्र चालू आहे. त्यामुळे मी शीख समाजात होत असलेल्या पालटांची माहिती प्रसारित केली.

‘मी हिंदु आहे’, हे छातीठोकपणे सांगा ! – श्री. अक्षत गुप्ता, लेखक

‘प्रकाशन आणि प्रसारमाध्यम अभ्यास यांमधील हिंदु दृष्टीकोन’ या विषयावर बोलतांना लेखक आणि पटकथा लेखक श्री. अक्षत गुप्ता यांनी सांगितले की, हिंदूंनी ‘प्रत्येक गोष्टीत आपण फार अल्प पडतो’, हा न्यूनगंड बाळगू नये. त्याऐवजी त्यांनी इतरांचे लक्ष वेधून घेतले पाहिजे, बेधडकपणे मत मांडले पाहिजे आणि ‘मी हिंदु आहे’, हे अभिमानाने आणि छातीठोकपणे सांगितले पाहिजे. या वेळी गुप्ता यांनी ‘प्रणाम, मी हिंदु आहे’ नावाची थरारक अशी स्वरचित कविता म्हणून दाखवली. ही कविता उपस्थित सर्व हिंदुत्वनिष्ठांच्या मनाला भावली.

भारत हे आंतरराष्ट्रीय निधीसाठी आकर्षक गुंतवणुकीचे मुख्य ठिकाण ! – सुभाष ठकरार, माजी अध्यक्ष, लंडन चेंबर ऑफ कॉमर्स

भारतातील गुंतवणुकीचे स्वरूप पालटले आहे. जागतिक गुंतवणुकीत भारताचा वाटा २-३ टक्क्यांवरून १३-१५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. आजचा  भारत हा आंतरराष्ट्रीय निधीसाठी आकर्षक गुंतवणुकीचे मुख्य ठिकाण ठरले आहे. चांगला उद्योजक निधीच्या विविध स्रोतांमधून सहजपणे गुंतवणूक मिळवू शकतो.

सौजन्य वर्ल्ड हिंदू कॉंग्रेस