नांदेड – मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावाची २ बनावट पत्रे सिद्ध करण्यात आली आहेत. यासंबंधीची तक्रार त्यांनी पोलीस ठाण्यात प्रविष्ट केली आहे, तसेच पोलीस अधीक्षकांनाही एक पत्र लिहिले आहे. अशोक चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदी असतांना त्यांच्या नावाचे बनावट पत्र सिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांच्या नावाने मराठा आणि धनगर आरक्षणासंबंधी बनावट पत्र सिद्ध करण्यात आले आहे, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
अशोक चव्हाण यांनी या प्रकरणी २० फेब्रुवारी २०२३ या दिवशी पोलिसांकडे लेखी तक्रार केली होती. आता संबंधित व्यक्तींनी पुन्हा अशी २ बनावट पत्रे सिद्ध केली आहेत. त्यातील १ पत्र मराठा आरक्षण, तर दुसरे पत्र धनगर आरक्षणाविषयी आहे. या दोन्ही खोट्या पत्रांद्वारे माझी भूमिका आरक्षणविरोधी असल्याचे भासवण्यात आली आहे, असा आरोप चव्हाण यांनी तक्रारीत केला आहे.