२६ आणि २७ नोव्हेंबरला कुमार कार्तिकस्वामींच्या दर्शनाचा पर्वकाल ! – अभिनव गिरी

कोल्हापूर, २४ नोव्हेंबर (वार्ता.) – श्री क्षेत्र प्रयाग येथे श्री संगमेश्वर महादेवाच्या मंदिरात प्राचीन काळापासून असणार्‍या कुमार कार्तिकस्वामींच्या दर्शनासाठी सहस्रोंच्या संख्येने भाविक येतात. या वर्षी कार्तिक शुक्ल चतुर्दशी म्हणजेच २६ नोव्हेंबर या दिवशी दुपारी ३ वाजून ५४ मिनिटांपासून ते २७ नोव्हेंबर या दिवशी दुपारी १ वाजून ३५ मिनिटांपर्यंत पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र आहे. तरी २६ आणि २७ नोव्हेंबरला कुमार कार्तिकस्वामींच्या दर्शनाचा पर्वकाल असून भाविकांनी स्नान करून कार्तिकेयांचे दर्शन घ्यावे, असे आवाहन कुमार कार्तिकस्वामी मंदिराचे मुख्य पुजारी श्री. अभिनव गिरी यांनी पत्रकार परिषदेत केले. या प्रसंगी मंदिराचे मानकरी पुजारी श्रीमती सावित्री शिवाजी गोसावी, सर्वश्री प्रकाश सरनाईक, आनंद शहा, मनोहर मोरे, कृष्णात यादव, नामदेव चौगुले उपस्थित होते.

श्री. अभिनव गिरी पुढे म्हणाले, ‘‘हे मंदिर २६ नोव्हेंबरला सकाळी ७ ते २७ नोव्हेंबरच्या रात्री ९ पर्यंत खुले असणार आहे. या मंदिरातील कुमार कार्तिकस्वामींची मूर्ती अत्यंत प्राचीन असून ती ६ तोंडे आणि १२ हात असलेली आहे.’’ या प्रसंगी श्री. प्रकाश सरनाईक म्हणाले, ‘‘भारतात उत्तराखंड, काशी आणि त्यानंतर कोल्हापूर येथे श्री क्षेत्र प्रयाग हे संगमाचे स्थान आहे. हे स्थान दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. येथे कुंभी, कासारी, भोगावती, तुळशी आणि अदृश्य सरस्वती अशा ५ नद्यांचा संगम होऊन पुढे पंचगंगा निर्माण होते. या ठिकाणी प.पू. मोहिनीगिरी महाराज यांना श्री दत्तगुरूंच्या पादुका मिळाल्या असून या ठिकाणी महाराजांची समाधीही आहे. हा अपूर्व असा योग असून या २ दिवसांत भाविकांचे दर्शन सुलभ आणि जलद होण्यासाठी सर्व भक्तगण प्रयत्नशील आहेत.’’