परोपकारासाठी झिजणे
सुजनं व्यजनं मन्ये चारुवंशसमुद्भवम् ।
आत्मानं च परिभ्राम्य परतापनिवारणम् ।।
अर्थ : ‘उत्तम जातीच्या झाडापासून बनवलेल्या पंख्याप्रमाणे चांगल्या वंशात जन्मलेला माणूस असतो’, असे मला वाटते; कारण पंखा स्वतःभोवती फिरून फिरून दुसर्यांचा ताप कमी करतो आणि सज्जन वाटेल ते कष्ट करून दुसर्यांचे दुःख नाहीसे करतो.
श्रीमंत कंजुषापेक्षा उदार माणूस श्रेष्ठ
दाता लघुरपि सेव्यो न भवति कृपणो महानपि समृद्ध्या ।
कूपोऽन्तःस्वादुजलः प्रीत्यै लोकस्य न समुद्रः ।।
– पञ्चतन्त्र, तन्त्र २, श्लोक ७४
अर्थ : उदार माणूस लहान असला, तरी त्याची सेवा करावी; पण वैभवाने मोठ्या असलेल्या कंजूष माणसाची सेवा करू नये. मधुर पाणी असलेली विहीर लोकांना संतोष देते, तसा संतोष समुद्र देत नाही.
प्रेम करणे, हाच सज्जनांचा गुणधर्म
को हि तुलामधिरोहति शुचिना दुग्धेन सहजमधुरेण ।
तप्तं विकृतं मथितं तथापि यत्स्नेहमुद्गिरति ।।
अर्थ : पवित्र आणि स्वभावतः मधुर अशा दुधाची तुलना कोण करील ? ते जरी तापवले, घुसळले किंवा त्याचे दही केले, तरी त्यातून तूपच बाहेर पडते.
त्याप्रमाणे सज्जन माणसांचा कितीही छळ केला, तरी ते प्रेमच करतात.