मुंबईतील महिलांवरील अत्याचारांचे प्रमाण चिंताजनक !
मुंबई – वर्ष २०१३-२०२२ या १० वर्षांच्या काळात मुंबईतील बलात्कार आणि विनयभंग यांच्या घटना दुपटीहून अधिक वाढल्या आहेत. वर्ष २०१३ मध्ये मुंबईत बलात्काराच्या ३९१ घटना घडल्या होत्या, तर विनयभंगाच्या १ सहस्र १३७ घटना होत्या. त्यामध्ये अनुक्रमे ९०१ आणि २ सहस्र ३२९ इतकी म्हणजे दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. ‘प्रजा फाऊंडेशन’च्या वतीने मुंबई प्रेस क्लबमध्ये २३ नोव्हेंबर या दिवशी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. मुंबईतील महिलांवरील वाढत्या अत्याचारांची ही स्थिती कायदा आणि सुव्यवस्था यांच्या दृष्टीने चिंताजनक आहे.
‘मुंबईतील पोलीस यंत्रणा आणि कायदा अन् सुव्यवस्था २०२३’ हा अहवाल प्रजा फाऊंडेशनने या पत्रकार परिषदेत सादर केला. मुंबईतील गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असतांना गुन्ह्यांचे अन्वेषण करणार्या अधिकार्यांचे रिक्त पदांच्या प्रमाणामध्येही काही प्रमाणात वाढ झाली आहे. मान्यता असलेल्या पोलीस अधिकार्यांची रिक्त पदे जुलै २०२३ पर्यंत २२ टक्के होती.
पोक्सोच्या गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात वाढ !
वर्ष २०२२ मधील मुंबईत नोंदवण्यात आलेल्या बलात्काराच्या एकूण घटनांमध्ये ६३ टक्के गुन्हे पोक्सो (लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा) कायद्याच्या अंतर्गत नोंदवण्यात आले आहेत. वर्ष २०२२ च्या अखेरपर्यंत पोक्सो अंतर्गत नोंदवण्यात आलेल्या ७३ गुन्ह्यांचा शोध लागलेला नाही.
सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ !
जगभरात सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. मुंबईमध्ये वर्ष २०१८ ते २०२२ या कालावधीत सायबर गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वर्ष २०१८ मध्ये मुंबईमध्ये १ सहस्र ३७५ असलेले सायबर गुन्हे वर्ष २०२२ मध्ये ३ सहस्र ७२३ पर्यंत वाढले आहेत. यामध्ये ‘क्रेडिट कार्ड’ द्वारे फसवणूक केल्याचे गुन्हे सर्वाधिक आहेत.