गाझामध्ये ४ दिवसांसाठी युद्धविराम !

हमास ५० ओलीस, तर इस्रायल १५० पॅलेस्टिन बंदीवान यांची सुटका करणार !

तेल अविव (इस्रायल) – इस्रायलच्या मंत्रीमंडळाने हमाससमवेतच्या कराराला अनुमती दिली आहे. या करारानुसार हमास ५० ओलिसांची सुटका करेल आणि त्या बदल्यात इस्रायलचे सरकार १५० पॅलेस्टिनी बंदीवानांची सुटका करील. हमासच्या कह्यात २४० ओलीस आहेत, तर इस्रायलने शेकडो पॅलेस्टिनींना अटक केलेली आहे. ओलीस  आणि बंदीवान यांची सुटका करण्यासाठी ४ दिवसांच्या युद्धविरामाला संमती देण्यात आली आहे. हमास ओलीस ठेवलेल्या इस्रायली नागरिकांपैकी ३० हून अधिक लहान मुले आणि त्यांच्या माता मिळून ५० जणांची सुटका करील. प्रतिदिन १२-१३ ओलिसांना मुक्त केले जाईल. याव्यतिरिक्त इस्रायल गाझामध्ये विमानांचे उड्डाण करणार नाही, तसेच गाझामध्ये सैन्य वाहन नेणार नाही आणि कुणालाही अटकही करणार नाही.

पॅलेस्टिनी बंदीवानांच्या सुटकेला पीडित इस्रायलींचा विरोध

या कराराला संमती देण्यपूर्वी ७ ऑक्टोबर या दिवशी हमासच्या आक्रमणात मारल्या गेलेल्या इस्रायलींच्या कुटुंबियांनी हमासशी कोणत्याही प्रकारच्या व्यवहाराला विरोध करण्यास प्रारंभ केला. त्यांच्या संघटनेने एक निवेदन प्रसारित करत म्हटले की, ओलिसांच्या बदल्यात आतंकवाद्यांना सोडले, तर विरोध केला जाईल. आज आपण आतंकवाद्यांसमोर झुकलो आणि त्यांना सोडले, तर भविष्यात ते पुन्हा आपल्याला लक्ष्य करणार नाहीत, याची काय शाश्‍वती ? हीच चूक याआधीही झाली होती आणि आता त्याचीच पुनरावृत्ती होणार आहे. आतंकवाद्यांना कोणत्याही किमतीत सोडता कामा नये.

इस्रायलला शस्त्रास्त्रांचा पुरवठा बंद करा ! – सौदी अरेबियाच्या राजकुमारचे आवाहन

सौदी अरेबियाचे राजकुमार सलमान

२१ नोव्हेंबर या दिवशी ऑनलाईन ब्रिक्स शिखर परिषद पार पडली. या वेळी सौदी अरेबियाचे राजकुमार सलमान यांनी सर्व देशांना इस्रायलला शस्त्रास्त्रांची निर्यात थांबवण्याचे, तसेच इस्रायलला आक्रमण थांबवण्याचे आवाहन केले. या बैठकीचे आयोजन दक्षिण आफ्रिकेने केले होते. या बैठकीस चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिनही उपस्थित होते. इस्रायल-हमास संघर्षावर सर्वसमंतीने एक मत निर्माण करणे, हा या बैठकीचा उद्देश आहे.

संपादकीय भूमिका

युद्धविरामाच्या ४ दिवसांत हमास पुन्हा युद्धासाठी सिद्धता करील आणि पुन्हा इस्रालयवर आक्रमण करील, ही भीती खरी झाल्यास त्याला कोण उत्तरदायी रहाणार ?