शिवराज्याभिषेकदिनाच्या ३५० व्या वर्षाच्या निमित्ताने…
दिग्रस (यवतमाळ), २१ नोव्हेंबर (वार्ता.) – येथे गेल्या १७ वर्षांपासून शिवतेज संस्था, दिग्रस शहर आणि परिसर येथे ‘शिवतेज किल्लोत्सव’चे यशस्वी आयोजन करत आहे. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याने शिवतेज किल्लोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. ‘शिवतेज किल्लोत्सवा’तून प्रेरणा घेऊन अनेक सेवाभावी संस्था, शिवप्रेमी संघटना, शिक्षण संस्था पुढाकार घेऊन अनेक शहरे, जिल्हे यांसह राज्यभर या किल्लोत्सवाचे आयोजन करत असतात. या स्पर्धेचे परीक्षण ३ डिसेंबर या दिवशी करण्यात येणार आहे.
प्रतिवर्षी दिवाळीच्या सुट्यांमध्ये ‘शिववैभव किल्ले बनवा’ स्पर्धेचे आयोजन येथे केले जाते. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आणि निःशुल्क असून स्पर्धेत कुणीही वैयक्तिक किंवा सामूहिकरित्या सहभाग घेऊ शकतो. दगड, माती, विटा, सिमेंट यांचा वापर केलेले पर्यावरणपूरक नोंदणीकृत गडच स्पर्धेत विचारात घेतले जातात. गडांचे परीक्षण आणि स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते केले जाते. प्रथम येणार्या चार जणांसह सर्वांनाच आकर्षक स्मृतीचिन्हे, प्रमाणपत्रे देऊन गौरवण्यात येते.
या स्पर्धेच्या आयोजनासाठी सर्वश्री संतोष झाडेगुरुजी, सुशील घोलप, संजीव लोखंडे, डॉ. लक्ष्मण गावंडे, वसंत खोडके, डॉ. माणिक मुनेश्वर, प्रा. डॉ. अनंत शिंदे, पांडुरंग दारोळकर, विजयालक्ष्मी झाडे, स्नेहा चिंतावार, प्रतिभा करे, सुरेंद्र राठोड, ऋषिकेश हिरास, सदानंद जाधव, अमोल झरकर, अमोल राठोड, अमोल सराफ आदी ‘शिवतेज संस्थे’चे संचालक मंडळ प्रयत्नशील आहेत. ‘शिवतेज किल्लोत्सव’चे संयोजक श्री. संतोष झाडे (गुरुजी) यांनी सर्व शिवप्रेमींना शिवकालीन गड उभारून या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.