54th iffi 2023 Opening Ceremony : चित्रपट निर्मितीमध्ये प्रमुख स्थान बनण्याच्या दृष्टीने गोव्याची वाटचाल ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे शानदार उद्घाटन !

गोव्यात लवकरच चित्रपट नगरी निर्माण करणार असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा

दीपप्रज्वलन करतांना अनुराग ठाकूर, केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि मान्यवर

पणजी, २० नोव्हेंबर (वार्ता.) : चित्रपट निर्मितीमध्ये प्रमुख स्थान बनण्याच्या दृष्टीने गोव्याची वाटचाल चालू आहे आणि गोव्यात होणार्‍या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामुळे गोव्यात चित्रपट निर्मितीसाठी पोषक वातावरण निर्माण होण्यास साहाय्य होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. बांबोळी येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी मैदानात ५४ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (‘आंचिम’च्या) उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल्. मुरुगन, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, गोवा मनोरंजन सोसायटीच्या उपाध्यक्षा तथा आमदार डिलायला लोबो, चित्रपट सृष्टीतील कलाकार शाहिद कपूर, माधुरी दीक्षित, सनी देओल, तसेच चित्रपट दिग्दर्शक, लेखक आणि चित्रपट रसिक यांची उपस्थिती होती. प्रारंभी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर अन् इतर मान्यवर यांच्या हस्ते ५४ व्या ‘आंचिम’चे उद्घाटन करण्यात आले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘आंचिम’ हा जगातील १४ वा सर्वांत मोठा उत्सव आहे आणि वर्ष २००४ पासून गोवा राज्य या महोत्सवाचे यजमानपद भूषवत आहे.

गोव्यात लवकरच चित्रपट नगरी उभी रहाणार आहे. पुढील २ ते ३ वर्षांत हे काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.’’

वर्ष २०४७ पर्यंत ‘आंचिम’ जगातील सर्वांत मोठा चित्रपट महोत्सव बनवूया ! – अनुराग ठाकूर, केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री

गोव्यात होणारा ‘आंचिम’ वर्ष २०४७ पर्यंत जगातील सर्वांत मोठा चित्रपट महोत्सव बनवण्यासाठी चित्रपट सृष्टीशी निगडित व्यक्तींनी प्रयत्न करावे, असे आवाहन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पुढे भारतात विदेशी चित्रपट निर्मितीसाठी काही मर्यादेपर्यंत ४० टक्के सवलत दिली जाणार असल्याची घोषणा केली.