पणजी, २० नोव्हेंबर (वार्ता.) : अरबी समुद्रातील पाण्यात विविध महत्त्वाच्या ठिकाणी पाण्याच्या वरच्या भागातील (५० मीटरपर्यंत) तापमानात वाढ झालेली आहे. पाण्याच्या खारटपणातही वाढ झालेली आहे. समुद्रावरील वार्याचा वेग उणावणे, तसेच ‘रेड सी’ आणि ‘पर्शियन गल्फ’ येथून काही प्रमाणात गरम आणि खारटपणा अधिक असलेल्या पाण्याचे मिश्रण या प्रमुख कारणामुळे हे घडत आहे. यामुळे जलचर आणि पर्यावरण यांवर विपरीत परिणाम होणार आहे, असा निष्कर्ष ‘सी.एस्.आय.आर्.’ आणि राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था (एन्.आय.ओ.) यांनी नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात दिली आहे.
सर्वेक्षणात दिलेल्या माहितीनुसार हवेतील आर्द्रता हा वादळ निर्मितीसाठी महत्त्वाचा घटक आहे. समुद्रातील पाण्याचे तापमान वाढल्याने हवेची आर्द्रता वाढते आणि वादळ निर्माण होण्याची शक्यताही वाढते. हल्लीच्या काळात अरबी समुद्राच्या वरच्या भागातील पाण्याचे तापमान वाढणे, हवेतील आर्द्रता वाढणे या प्रमाणात वाढ झालेली आहे. याला मानवी आणि औद्योगिक कारवाया बहुतांशपणे उत्तरदायी आहेत. अरबी समुद्रात यापूर्वी १ ऑगस्ट २००७ या दिवशी ‘गोणू’ (५ व्या श्रेणीतील वादळ) नावाचे वादळ आले होते आणि या वेळी वार्याचा वेग प्रतिघंटा २४० कि.मी. होता. यामुळे ५० लोकांचा मृत्यू झाला होता आणि ओमान देशात कोट्यवधी रुपयांची हानी झाली होती. अरबी समुद्रात वर्ष २०१९ मध्ये २४ ऑक्टोबर ते नोव्हेंबर मास या काळात ‘क्यार’ (चौथ्या श्रेणीतील वादळ) या नावाचे वादळ आले होते.