११.१०.२०२१ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सुश्री (कु.) तेजल पात्रीकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांनी कतरास (झारखंड) येथील सनातन संस्थेचे संत पू. प्रदीप खेमका (सनातनचे ७३ वे समष्टी संत) यांची पत्नी पू. (सौ.) सुनीता खेमका (सनातनच्या ८४ व्या समष्टी संत) यांच्याशी वार्तालाप केला. त्या वेळी पू. प्रदीप खेमका आणि पू. (सौ.) सुनीता खेमका यांच्या सासूबाई पू. गीतादेवी खेमका (सनातनच्या ८३ व्या व्यष्टी संत) या उपस्थित होत्या. त्यांचा संपूर्ण परिवार साधनेत आहे. त्यांच्या सुसंवादातून उलगडलेला पू. (सौ.) सुनीता खेमका यांचा साधनाप्रवास पुढे दिला आहे.
१. गुरुदेवांच्या कृपेने नामजप आरंभ होऊन एकटेपणा अल्प होणे आणि ‘ईश्वरच सर्व करणार’, अशी श्रद्धा निर्माण होणे
सुश्री (कु.) तेजल पात्रीकर : ‘नमस्कार, आज आपल्याकडे कतरास, झारखंड येथून पू. प्रदीप खेमका आले आहेत. त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी पू. (सौ.) सुनीता खेमका आणि पू. प्रदीप खेमका यांच्या आई पू. (श्रीमती) गीतादेवी खेमका या आल्या आहेत. एकाच परिवारात तीन संत हे या परिवाराचे वैशिष्ट्य आहे.
नमस्कार, आपल्या परिवाराचे वैशिष्ट्य हे आहे की, तीन जणांना गुरुदेवांनी संतपदापर्यंत नेले आहे, तर साधनेचे प्रयत्न आपण कसे करता आणि ‘पू. (सौ.) सुनीता खेमका या घरातील सर्व सांभाळून साधना कशा करतात’, याविषयी आम्हाला सांगा.
पू. (सौ.) सुनीता खेमका : आम्ही प्रथम गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला गेलो होतो. त्यानंतर कधी कधी यजमानांना संजीवभैय्यांचा (पू. संजीव कुमार, सनातनचे ११५ वे समष्टी संत) व्यवसायाच्या संदर्भात दूरभाष यायचा. त्या वेळी मी कधीतरी दूरभाष घेत असे. तेव्हा ते मला विचारायचेे, ‘‘आपण नामजप आरंभ केलात का ?’’ तेव्हा मला असेच वाटत होते, ‘अरे, मी तर लहानपणापासूनच पूजा-पाठ करते, तर नामजपाने काय होणार ?’; परंतु मला काय झाले ठाऊक नाही. ती प.पू. गुरुदेवांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) कृपाच होती की, माझा नामजप कसा चालू झाला, ते मला समजलेच नाही. तेव्हा परिवारातील सर्व सदस्य जयपूरला स्थलांतरित झाले होते आणि घरात आम्ही दोघेच रहात होतो. त्या वेळी मला फार एकटेपणा जाणवत होता; परंतु मी नामजप चालू केल्यानंतर माझा एकटेपणा आपोआपच अल्प होत गेला.
सुश्री (कु.) तेजल : तुम्ही ईश्वराशी जोडल्या गेलात ना !
पू. (सौ.) खेमका : हो. ईश्वराशी जोडल्यानंतर पुनः कधी ‘मी एकटी आहे’, असे मला कधी वाटले नाही. ‘ईश्वर आहे ना, तो सर्व आपोआप करून घेईल’, असा हळूहळू माझ्या विचारांमध्ये पालट होऊ लागला.
२. गुरुपौर्णिमेशी संबंधित सेवा आणि सामूहिक नामजप इत्यादींच्या माध्यमातून गुरुदेवांद्वारे एकेका चरणाची साधना करून घेणे
पू. (सौ.) खेमका : पूर्वी गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या वेळी मला ‘पादत्राणे विभाग’ सांभाळण्याची सेवा मिळाली होती.
सुश्री (कु.) तेजल : आपण एका उद्योगपतीची पत्नी आहात आणि अशी एकदम पादत्राणे नीट लावण्याची सेवा मिळाली. तेव्हा आपल्या मनाची स्थिती कशी होती ?
पू. (सौ.) खेमका : ताई, मला तसे काहीच वाटत नव्हते. मला असे कधी जाणवले नाही की, मला वक्त्याची सेवा मिळाली पाहिजे. प.पू. गुरुदेवांनीच माझ्याकडून सर्व सेवा करून घेतली.
सुश्री (कु.) तेजल : किती सुंदर ना ! आपण दोघे आधीपासूनच साधनेमुळे सात्त्विक असल्यामुळे ईश्वराने सहजतेने आपल्याला पुढे नेले.
३. साधनेच्या सर्व अंगांचे प्रयत्न गुरुदेवांनी करून घेणे आणि ‘संपूर्ण परिवार त्यांच्या चरणांच्या अंगठ्यावरील धूलिकणासमान आहे’, अशी अनुभूती नेहमी येणे
पू. (सौ.) खेमका : आम्ही नामजप करत होतो, नंतर सत्संगात जात होतो. कुलकर्णीदादा (डॉ. मंगलकुमार कुलकर्णी) अभ्यासवर्ग घेण्यासाठी कतरासला येत होते. त्या वेळी मी अभ्यासवर्गामध्ये उपस्थित रहात नव्हते; परंतु सर्वांची सेवा, म्हणजे त्यांच्यासाठी स्वयंपाक करणे, सर्वांना खाऊ घालणे, ही सेवा मी केली आहे. माझी सत्सेवा अशी झाली आणि त्यातच माझा त्यागाचा भागही झाला. हळूहळू मनाचा त्याग होऊ लागला, ‘मनाला जे वाटते, ते करायचे नाही, तर दुसर्यांचे ऐकून करायचे आहे. पू. भैय्या जसे सांगत होते, तसेच मला शब्दशः करायचे आहे.’ अशा प्रकारे माझा त्याग झाला. मला वाटायचे, ‘आपण सर्वांत मोठे आहोत आणि कुटुंबातील सर्व जण लहान आहेत, तर सर्वांवर, म्हणजे दीर-नणंद इत्यादींवर आपल्या मुलांपेक्षा अधिक प्रेम करायचे. प्रेमभावानेच संपूर्ण कुटुंबाला घेऊन जायचे आहे.’ साधनेची पाच अंगे प.पू. गुरुदेवांनी हळूहळू आपोआपच करून घेतली. मला आरंभापासून प्रत्येक क्षणी असे वाटत होते, ‘प.पू. गुरुदेवांच्या चरणांवर जे धूलिकण आहेत, ते म्हणजे आमचे कुटुंबच आहे.’
४. यजमानांचे १०० टक्के आज्ञापालन केल्यामुळे साधनेत प्रगती होणे
सुश्री (कु.) तेजल : आता पू. भाभी आपण सांगा की, तुमचा तुमच्या यजमानांसह साधनाप्रवास कसा होता ?
पू. (सौ.) खेमका : ही प.पू. गुरुदेवांची कृपा समजा की, आज्ञापालनाचा गुण माझ्यामध्ये असल्यामुळे त्यांनी जे काही सांगितले, तसे मी केले. ‘आता एवढे जण येणार आहेत, येथे जायचे आहे, उदा. हनुमानकवच यज्ञासाठी वाराणसीला जायचे आहे’, असे त्यांनी सांगितले, तर मी तिथे जायचे. आम्ही कधी एकटे राहिलोच नाही. आम्ही नेहमी एकत्रच राहिलो; परंतु तेथील एक साधिका पतींना म्हणाल्या, ‘‘आपण काही दिवसांसाठी वाराणसी आश्रमात थांबा’, तेव्हा ते थांबले. जे सांगितले आहे, त्याचे ते आज्ञापालन करायचे. कोणतीही सेवा मिळत होती. साधक घरी रहायला येत होते, तर त्यांची सेवा केली, त्यांनी जे सांगितले, ते मी करत गेले. अक्षरशः १०० टक्के आज्ञापालन केले. माझ्या मनाला मान्य असो वा नसो, म्हणजे माझा स्वभाव असा आहे की, मी ‘नाही’ असेही सांगते. माझे यजमान १०० टक्के सकारात्मक असतात, तर मी १०० टक्के सकारात्मक नसते; परंतु ‘त्यांनी जे सांगितले, ते करायचे’, असे ठरवल्यावर मी ते करत गेले. असे करता करता त्यांच्यासह माझीही प्रगती प.पू. गुरुदेवांनी करून घेतली.
आमच्या इथे धर्मसभा व्हायची, त्यामध्ये जी सेवा मिळेल, ती संपूर्ण सेवाभावाने आणि परिपूर्ण करत होते. पू. भैय्यांनी (पू. प्रदीप खेमका यांनी) सांगितलेली प्रत्येक सेवा मी करत होते. प.पू. गुरुदेवांनी माझ्या मनात ‘घर सोडून कसे जायचे ?’, असा आसक्तीयुक्त विचार कधी ठेवलाच नाही. घर उघडे ठेवून सेवेला जायचे. अशा प्रकारे सेवा करता करता ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाली.
५. विवाहाचा वाढदिवस आणि तिथीनुसार वाढदिवस असलेल्या दिवशी कुंभच्या पवित्र क्षेत्री संतपद घोषित होणे !
पू. (सौ.) खेमका : १६ फेब्रुवारीला आमच्या विवाहाचा वाढदिवस आणि माघ शुक्ल एकादशीला जन्मतिथीनुसार माझा वाढदिवस असतो. ज्या दिवशी (संतपद प्राप्त झाले, त्या दिवशी) ते दोन्ही दिवस होते. माघ शुक्ल एकादशी आणि
१६ फेब्रुवारी, असे एकाच दिवशी आले. त्यातही ते कुंभचे पवित्र क्षेत्र होते. माझी रासही कुंभच आहे. (कुंभमेळा चालू असतांना त्यांचे संतपद घोषित करण्यात आले होते.) असे करून जणू प.पू. गुरुदेव आम्हाला सर्वाधिक आनंद देऊ इच्छित होते ! इतर वेळी त्यांनी माझे संतपदही घोषित केले असते, तर कदाचित् तो दिवस माझ्या लक्षात राहिला नसता आणि मला एवढा आनंद मिळाला नसता, जेवढा आनंद त्या दिवशी मिळाला. त्या वेळी माझ्याकडून प.पू. गुरुदेवांप्रती एवढी कृतज्ञता व्यक्त झाली, जणू आमच्यासाठी जे सर्वश्रेष्ठ आहे, ते प.पू. गुरुदेव आम्हाला देऊ करतात.
असे वाटले की, वाढदिवसही त्याच दिवशी, विवाहही त्याच दिवशी आणि जणू पुढची प्रगतीही त्याच दिवशी झाली. प.पू. गुरुदेवच त्याचा पुष्कळ आनंद अनुभवायला देतात. मला त्यांच्याप्रती एवढी कृतज्ञता वाटते की, मला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्दच अपुरे पडत आहेत.
६. साधकांना संदेश
६ अ. आपल्या दुःखाचे कारण दुसरे कुणी नसून आपण स्वतःच असल्यामुळे स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवून साधनेत प्रगती करावी !
सुश्री (कु.) तेजल : पू. भाभी, ‘समष्टीसाठी या काळात टिकून रहाण्यासाठी साधनेचे प्रयत्न कसे करायला पाहिजे ?’, याविषयी सांगा.
पू. (सौ.) खेमका : साधकांनी सर्वाधिक आज्ञापालन करण्यावर भर द्यावा. स्वभावदोषांमुळेच आपली मने एकमेकांशी जुळत नाहीत. आपल्या विचारांमध्ये मतभेद होतात. आता प.पू. गुरुदेवांनी ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ सांगितली आहे. त्यामध्ये सर्वांत प्रथम क्रमांकावर स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलनच ठेवले आहे. आम्ही साधना केली, अनुभूती घेतली आणि खरोखर स्वभावदोष-निर्मूलनाची प्रक्रिया केली. तेव्हा लक्षात आले की, माझ्या स्वभावदोषांमुळेच मला दुःख होत होते. आपल्या दुःखाचे कारण दुसरे कुणी नसून आपण स्वतःच आहोत. प.पू. गुरुदेवांनी आपल्याला जे काही सांगितले आहे, त्यांच्या त्या आज्ञेचे पालन १०० टक्के केले, तर जीवनात आपण सर्व जण पुढे जाऊ.
माझी सर्वांना हीच प्रार्थना आहे, विनंती आहे, ‘प.पू. गुरुदेवांनी आपल्याला हे स्वभावदोष आणि अहं याविषयी सांगितले आहे, त्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करा. जेव्हा आपले स्वभावदोष आणि अहं न्यून होतील, तेव्हा गुण आपोआप वाढतील. अहं अल्प झाला, तर भाव आपोआप वाढेल. तेव्हा गुरुकृपायोगानुसार साधनेचे एक एक चरण पूर्ण करत आपण सर्व जण निश्चित पुढे जाऊ.’
सुश्री (कु.) तेजल : आपण सर्व जण आज येथे आलात आणि शब्दांच्या पलीकडचे मार्गदर्शन आम्हाला मिळाले, आपल्या चैतन्याचाही आम्हाला लाभ झाला. या सर्वांसाठी मी आपल्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते आणि भगवान श्रीकृष्णानेही निर्विघ्नपणे आपला सुसंवाद करून घेतला, त्याबद्दल त्याच्याही चरणी कृतज्ञता व्यक्त करूया.’
(११.१०.२०२१)
(समाप्त)