Ramaswamy Hindu : हिंदु धर्मानेच मला स्वातंत्र्य दिले, तसेच राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी प्रेरित केले !

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे हिंदु उमेदवार विवेक रामास्वामी यांचे कथन !

अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार विवेक रामास्वामी

वॉशिंग्टन (अमेरिका) – हिंदु धर्माने मला हे स्वातंत्र्य दिले आहे की, मी माझी नैतिक दायित्वे समजू शकीन. हिंदु धर्मानेच मला राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढण्यासाठी प्रेरणा दिली, असे वक्तव्य अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाचे हिंदु उमेदवार विवेक रामास्वामी यांनी केले. ते १८ नोव्हेंबर या दिवशी ‘द डेली सिग्नल प्लॅटफॉर्म’द्वारे आयोजित ‘द फॅमिली लीडर फोरम्’ या कार्यक्रमात बोलत होते.

रामास्वामी पुढे म्हणाले की,

१. मी एक हिंदु आहे. ईश्‍वर सत्य आहे, असे मी मानतो. भगवंताने मला एका उद्देशासाठी जन्म दिला आहे. तो उद्देश साकार करण, हे माझे नैतिक कर्तव्य आहे.

२. आपल्या प्रत्येकात ईश्‍वर निवास करतो, हे आमच्या धर्माचे मूळ आहे. यामुळेच आपण सर्व जण समान आहोत.

३. या वेळी रामास्वामी यांनी हिंदु आणि ख्रिस्ती धर्म यांच्यातील साम्याविषयीही भाष्य केले. तुम्हाला काय वाटते की, मी असा राष्ट्राध्यक्ष बनावे, जो ख्रिस्ती धर्मास प्रोत्साहन देईल, अजिबात नाही. मला वाटत नाही की, अमेरिकी राष्ट्राध्यक्षाने असे केले पाहिजे. माझे हे कर्तव्य आहे की, मी अमेरिकी मूल्यांसाठी उभे रहायला हवे आणि मी तसेच करीन, असेही रामास्वामी म्हणाले.

घटस्फोटाला हिंदु धर्मात थारा नाही ! – रामास्वामी

या वेळी रामास्वामी म्हणाले, ‘‘विवाह पवित्र आहे. विवाहाच्या आधी आपण संयम राखला पाहिजे. वाईट विचारांपासून आपण सावध रहायला हवे. विवाह स्त्री आणि पुरुष यांच्यात होत असतो. घटस्फोटाला हिंदु धर्मात थारा नाही. स्त्री आणि पुरुष भगवंताच्या साक्षीने विवाहबद्ध होतात. कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी दोघे भगवंतासमोर वचन घेतात. माझ्या विशिष्ट संगोपनामुळेच माझ्या मनात कुटुंब, विवाह, आई-वडील यांच्याप्रती आदर निर्माण झाला. माझ्या आई-बाबांनीच मला शिकवले की, कुटुंब आपल्या जीवनाचा आधार आहे.’’

संपादकीय भूमिका

विवाहसंस्थेला वेशीला टांगणार्‍या आणि ‘हूक अप कल्चर’सारख्या भयावह चालीरिती रूढ झालेल्या अमेरिकेला विवेक रामास्वामी यांच्यासारखे हिंदु नेतेच रसातळातून बाहेर काढू शकतात, हेच सत्य आहे !

(हूक अप कल्चर म्हणजे केवळ एका दिवसापुरते लैंगिक किंवा शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची विकृती ! यांतर्गत मानसिक प्रेमभावनांना कोणताच थारा नसतो.)

संपादकीय भूमिका

रामास्वामी यांच्या हिंदु धर्माचे माहात्म्य सांगणार्‍या अशा वक्तव्यांमुळे आता त्यांना कुणी अमेरिकी हिंदुद्वेष्ट्यांनी ‘सैतानी हिंदु’ म्हणून हिणवल्यास आणि भारतातील हिंदुद्रोह्यांनी त्यांची ‘री’ ओढल्यास आश्‍चर्य वाटू नये !