तेल अविव (इस्रायल) – गाझा पट्टीतील सर्वांत मोठ्या अल् शिफा रुग्णालयावर इस्रायलच्या सैन्याने नियंत्रण मिळवल्यानंतर ते पाडण्याची सिद्धता करण्यात येत आहे. यासाठी येथे बुलडोझर मागवण्यात आले आहेत. अल् शिफाच्या खाली बोगदे असून तेथे हमासचे तळ असल्याचा दावा अमेरिका आणि इस्त्रायल यांनी केला आहे. यापूर्वीच रुग्णालयात मोठा शस्त्रसाठा सापडला आहे. तसेच येथे हमासच्या आतंकवाद्यांशी चकमकही झाली. यात ५ आतंकवादी ठार झाले होते. सध्या या रुग्णालयात नवजात बालकांसह २ सहस्र ३०० रुग्ण, डॉक्टर, परिचारिका आणि नागरिक असल्याचा दावा संयुक्त राष्ट्रांनी केला आहे.
पॅलेस्टाईनचे भारताकडे साहाय्याचे आवाहन !
दुसरीकडे पॅलेस्टाईनने आता भारताकडे साहाय्यासाठी आवाहन केले आहे. पॅलेस्टाईनचे भारतातील राजदूत अदनान अबू म्हणाले की, भारत हा एक शक्तीशाली देश आहे, तो इस्रायलला रोखू शकतो. म. गांधी यांच्यानंतर भारताने नेहमीच पॅलेस्टाईनचा प्रश्न समजून घेतला आहे आणि शांतता प्रस्थापित करण्याला नेहमीच प्राधान्य दिले आहे.