Pakistan Allegations On RAW : (म्हणे) ‘भारत पाकिस्तानात घुसून हत्या करत आहे, ही जागतिक चिंतेची गोष्ट !’

पाकिस्तानचा कांगावा !

पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारताकडून होणार्‍या (आतंकवाद्यांच्या) हत्या आणि अपहरण यांची मोहीम पाकिस्तानच्या बाहेरही पसरली आहे. यामुळे केवळ पाकिस्तानलाच समस्या येत नाहीत, तर जागतिक स्तरावर चिंता वाढली आहे, असे विधान पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मुमताज झहरा बलोच यांनी पत्रकार परिषदेत एका प्रश्‍नाच्या उत्तरात केले. अमेरिकेतील वृत्तपत्र ‘वॉशिंग्टन पोस्ट’ने भारतावर अनेक आरोप केले होते. यात भारताची गुप्तचर संस्था ‘रिसर्च अँड नालिसिस विंग’ (रॉ) पाकिस्तानमध्ये सतत हत्या घडवून आणत असल्याचा आरोप केला होता. त्यावर विचारलेल्या प्रश्‍नावर बलोच यांनी वरील उत्तर दिले.

वॉशिंग्टन पोस्टने म्हटले होते, ‘भारत वर्ष २०२१ पासून अशा हत्या करत आहे.’ ब्रिटीश वर्तमानपत्र ‘द गार्डियन’नेही असाच दावा केला आहे. ‘परदेशात रहाणार्‍या २० आतंकवाद्यांना ठार मारण्याची योजना भारताने आखली आहे’, असा दावा या वृत्तपत्राने केला होता. ‘अनेक आतंकवादीही मारले गेले. भारतीय पंतप्रधान मोदी यांना या योजनेची माहिती होती’ असा दावाही यात करण्यात आला होता. भारताने हा दावा फेटाळून लावला होता.

ग्वादर बंदर परदेशी शक्तींना सैन्य तळासाठी देणार नाही !

बलोच यांनी दुसर्‍या प्रश्‍नाला उत्तर देतांना पाकच्या ग्वादर बंदरावर भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या की, ग्वादर बंदर केवळ पाकिस्तानच्या विकासासाठी चीनच्या पाठिंब्याने विकसित केले गेले आहे आणि परदेशी शक्तींना सैन्य तळ उभारण्यासाठी ते देण्याचा कोणताही हेतू नाही, असा दावा केला. (यावर कोण विश्‍वास ठेवणार ? – संपादक) 

संपादकीय भूमिका

  • भारत पाकिस्तानात घुसून हत्या करत आहे, याचा एकही पुरावा पाकिस्तानने सादर केलेला नसतांना अशा प्रकारचा आरोप करणे हास्यास्पदच होय !
  • पाकपुरस्कृत आतंकवादी संघटनांनी भारतात अनेक आक्रमणे केली आणि त्याचे सविस्तर पुरावे भारताने सादर करूनही पाककडून ते कधीही स्वीकारले गेले नाहीत. कसाबचा मृतदेहही पाकने स्वीकारला नाही. अशा पाककडून भारतावर बिनबुडाचे आरोप केले जात आहेत, हे लक्षात घ्या !