चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यात बैठक
सॅन फ्रॅन्सिस्को (अमेरिका) – कॅलिफोर्नियामध्ये चालू असलेल्या आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य शिखर परिषदेच्या वेळी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची १५ नोव्हेंबरच्या रात्री बैठक झाली. द्विपक्षीय बैठकीच्या पहिल्या सत्रात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन आणि चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी हेदेखील उपस्थित होते. या वेळी जिनपिंग म्हणाले की, अमेरिकेने तैवानला शस्त्रे देणे थांबवावे. चीनच्या एकीकरणाला पाठिंबा द्यावा.
१. जिनपिंग म्हणाले की, चीनच्या निर्यातीवर नियंत्रण, गुंतवणुकीची चौकशी आणि एकतर्फी निर्बंध यांमुळे चीनच्या हिताची हानी होत आहे. चीनचे विज्ञान आणि तंत्रज्ञान दडपून त्याचा विकास रोखला जात आहे. पृथ्वी इतकी मोठी आहे की, दोन्ही महासत्ता येथे राहू शकतात. आपले देश खूप भिन्न आहेत; परंतु आपण या फरकांच्या वर जाऊ शकतो. चीन आणि अमेरिका या दोन मोठ्या देशांसाठी एकमेकांपासून दूर जाणे हा पर्याय असू शकत नाही. दोन्ही देशांमधील संघर्ष आणि संघर्षाचे घातक परिणाम होऊ शकतात.
२. बैठकीत बायडेन म्हणाले की, मला आमच्या संभाषणाचा सन्मान आहे; कारण मला वाटते की, आम्ही एकमेकांना स्पष्टपणे समजून घेणे सर्वांत महत्त्वाचे आहे. येथे एक नेता दुसर्या नेत्याशी बोलत असतो, त्यामुळे आमच्यात गैरसमज होऊ शकत नाही. या स्पर्धेचे संघर्षात रूपांतर होता कामा नये, हे आपण ठरवायचे आहे.
३. पत्रकार परिषदेदरम्यान बायडेन म्हणाले की, जिनपिंग यांच्याशी माझी खूप चांगली चर्चा झाली. अनेक सूत्रांवर आमच्यात गंभीर आणि सकारात्मक चर्चा झाली. तैवानच्या सूत्रावर मी पुन्हा अमेरिकेची भूमिका स्पष्ट केली. आम्ही ‘एक चीन धोरणा’चे समर्थन करतो आणि हे कधीही पालटणार नाही.
संपादकीय भूमिकाचीन अमेरिकेकडे अशी मागणी करू शकतो, तर भारताने चीनकडे ‘पाकिस्तानला शस्त्रे देऊ नये’, अशी मागणी केली, तर त्यात चुकीचे काय ? |