लंडन (ब्रिटन) येथे हमास समर्थक आणि विरोधक यांच्या मोर्च्यामुळे हिंसाचार

१२० हून अधिक जणांना अटक

लंडन (ब्रिटन) – येथे हमासच्या समर्थकांनी ११ नोव्हेंबरला काढलेल्या मोर्च्याच्या वेळी झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी १२० हून अधिक जणांना अटक केली आहे. अनुमाने ३ लाख लोक या मोर्च्यात सहभागी झाले होते. याच वेळी इस्रायल समर्थकांनीही मोर्चा काढला होता. दोन्ही मोर्चे एकमेकांसमोर उभे ठाकल्याने हा हिंसाचार झाला. या हिंसाचारावर पंतप्रधान ऋषी सुनक यांनी चिंता व्यक्त करत टीका केली.

दुसर्‍या महायुद्धाच्या स्मृतीनिमित्त ब्रिटनमध्ये प्रतिवर्षी युद्धविराम दिवस साजरा केला जातो. याच दिवशी हमास समर्थकांनी मोर्चा काढला होता. या वेळी ज्यूंच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आणि हमासचा झेंडा फडकावण्यात आला. गाझामध्ये युद्ध चालू झाल्यापासून येथे हमासच्या समर्थनार्थ मोर्चे काढण्यात येत आहे; मात्र आताचा मोर्चा सर्वांत मोठा होता. या मोर्च्यात हिंसाचार होण्याची पोलिसांना शक्यता  होती; मात्र तो इतक्या मोठ्या प्रमाणात होईल, असे न वाटल्याने त्यांनी या मोर्च्याला अनुमती दिली होती. आता पंतप्रधान सुनक यांनी या हिंसाचाराची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.

संपादकीय भूमिका

भारतात उद्या असा हिंसाचार झाल्यास आश्‍चर्य वाटू नये !