मुंबईत फटाके फोडण्याची वेळ रात्री ८ ते १० !
मुंबई – मुंबईसह आसपासच्या परिसरात फटाके फोडण्याची वेळ मुंबई उच्च न्यायालयाने रात्री ८ ते १० अशी निश्चित केली आहे. याआधी सायंकाळी ७ ते रात्री १० अशी वेळ होती. मुंबई महानगर क्षेत्रातील प्रदूषणाच्या प्रश्नावर न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर हा आदेश देण्यात आला.
नाशिक येथे ३९७ किलो बनावट पनीर !
नाशिक – येथे ३९७ किलो बनावट पनीर अन्न आणि औषध प्रशासनाने हस्तगत केले आहे. या पनीरचे मूल्य ८४ सहस्र रुपयांहून अधिक आहे. बनावट पनीरचे नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले असून बाकी साठा नष्ट करण्यात आला आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी खेळणार्यांना शिक्षा करा !
तरुणाला नग्नावस्थेत नाचवणार्यांवर गुन्हा नोंद !
पुणे – येथे एका ३३ वर्षीय तरुणाला कपडे काढून नाचायला लावले. या वेळी त्याचा व्हिडिओ करून तो प्रसारित केला आहे, तसेच त्याच्याकडून ६० सहस्र रुपयेही उकळण्यात आले. पीडित तरुणाच्या तक्रारीनंतर सोमनाथ कोंडीबा राजभोज, चंद्रकांत बबन लांडगे, संजय आत्माराम सुतार, सुभाष हनुमंतराव भोसले यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सांस्कृतिक शहर म्हणवल्या जाणार्या पुण्यासाठी लज्जास्पद घटना !
मुंबईत वाहनांची चाके धुणार !
मुंबई – येथील प्रदूषण न्यून करण्यासाठी बाहेरून शहरात येणार्या वाहनांची चाके धुतली जाणार आहेत. सर्व प्रवेशद्वारांवर ‘वॉटर जेट स्प्रे मशीन’ बसवण्यात येणार आहे, असे महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले. हवेतील धूळ खाली बसण्यासाठी मुंबईत कृत्रिम पावसाची चाचपणी केली जाणार असल्याचे ते म्हणाले.
मुंब्रा येथे चोरट्यांनी भरदिवसा महिलेचे सोन्याचे दागिने लुटले
ठाणे, १० नोव्हेंबर (वार्ता.) – रिक्शाने प्रवास करणार्या महिलेचा पाठलाग करून तिच्या गळ्यातील २ लाख ८० सहस्र रुपयांची सोन्याची साखळी आणि बांगड्या जबरीने खेचून घेऊन चोरांनी पलायन केले. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.
असुरक्षित मुंब्रा शहर !
शरद पवार यांच्या भेटीनंतर अजित पवार देहली येथे अमित शहा यांची भेट घेणार !
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी नवी देहली येथे गेले आहेत. शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पुणे येथील बाणेर या निवासस्थानी ही भेट झाली. या वेळी खासदार सुप्रिया सुळे यांसह अन्य पवार कुटुंबीयही उपस्थित होते.