UP Pacemaker Deaths : इटावा (उत्तरप्रदेश) येथे अल्प गुणवत्तेचे पेसमेकर लावून २०० रुग्णांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या डॉक्टरला अटक !

डॉक्टर समीर सर्राफ

इटावा (उत्तरप्रदेश) – इटावा जिल्ह्यातील सैफई येथील आयुर्विज्ञान विश्‍वविद्यालयात शेकडो रुग्णांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार समोर आला आहे. येथील कार्डियोलॉजी (हृदयरोगाशी संबंधित) विभागातील प्रसिद्ध(?) डॉक्टर समीर सर्राफ यांनी वर्ष २०१७ ते २०२१ या काळात ६०० रुग्णांना अधिक पैसे घेऊन अल्प गुणवत्तेचे पेसमेकर यंत्र बसवले. त्यामुळे यातील २०० रुग्णांचा मृत्यू झाला. चौकशीनंतर डॉ. सर्राफ यांना अटक करण्यात आली आहे. डॉ. सर्राफ यांनी पैशाच्या लालसेपोटी रुग्णांची फसवणूक केली. त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याने त्यांना अटक करण्यात आली.

या संदर्भात रुग्णालय प्रशासनाला माहिती मिळाल्यावर एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली होती. चौकशीमध्ये डॉ. सर्राफ यांनी बनावट आस्थापनांची अल्प गुणवत्तेची पेसमकर्स विकत घेऊन रुग्णांना बसवली आणि त्यांच्याकडून ९ पट अधिक पैसे उकळले. डॉ. सर्राफ यांच्यावर रुग्णांच्या कुटुंबियांकडून बेकायदेशीररित्या पैसे उकळल्याचाही आरोप आहे. तसेच रुग्णालयात साहित्य उपलब्ध असतांना कोट्यवधी रुपयांचे साहित्य बाहेरून मागण्याचाही त्यांच्यावर आरोप आहे.

संपादकीय भूमिका

असे डॉक्टर वैद्यकीय क्षेत्राला कलंकच होत ! अशा डॉक्टरला फाशीचीच शिक्षा मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !