लोकलमध्ये ब्लेडने आक्रमण !
ठाणे – ठाणे ते कळवा रेल्वे स्थानकादरम्यान लोकलमध्ये एका तरुणावर धारदार ब्लेडने आक्रमण करण्यात आले. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
‘मॅफेड्रॉन’ विकणारा धर्मांध अटकेत !
नवी मुंबई – येथील कोपरी गाव परिसरात ‘मॅफेड्रॉन’ हा अमली पदार्थ विकणार्या सोएब महंमद सलीम अन्सारी (वय २१ वर्षे) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ५ लाख ११ सहस्र रुपयांचा ऐवज जप्त केला.
लाखो रुपयांची फसवणूक करणार्याला अटक !
पुणे – टेलिग्रामद्वारे लोकांशी संपर्क साधून विविध संकेतस्थळावरील कामे पूर्ण करण्याचे आमीष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणार्या आकाश उमेश पांडे याला नवी मुंबई पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. तो सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाऊंटंट) असून एका खासगी आस्थापनात उच्चपदस्थ अधिकारी आहे.
चहा-बिस्किट न मिळाल्याने आधुनिक वैद्य शस्त्रकर्म न करताच निघाले !
नागपूर – जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात चहा-बिस्किट वेळेत न मिळाल्याने आधुनिक वैद्य डॉ. तेजराम भलावे हे शस्त्रकर्म न करताच निघाले. भूल दिलेल्या ४ महिला रुग्णांना ताटकळावे लागल्याने त्रास झाला. या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. महिलांना कुटुंब नियोजनाचे शस्त्रकर्म करायचे होते. वरिष्ठांनी अन्य आधुनिक वैद्यांची शस्त्रकर्माची व्यवस्था केली.
दादर येथे भीषण आग !
मुंबई – दादर येथील महानगरपालिकेच्या कोहिनूर सार्वजनिक वाहनतळात ६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री भीषण आग लागली. त्यात १६ चारचाकी आणि दोन दुचाकी जळून खाक झाल्या. मध्यरात्री २.३० वाजता अग्नीशमन दलाने आग विझवली. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र वाहनांची पुष्कळ हानी झाली आहे.