सातारा, ७ नोव्हेंबर (वार्ता.) – जिल्ह्यातील जावली तालुक्यातील मुनावळे येथे अत्याधुनिक आणि सर्व सोयींनी युक्त असे आंतरराष्ट्रीय प्रतीचे पर्यटन स्थळ विकसित करण्यात येत आहे. या माध्यमातून १०५ गावांतील स्थानिकांना रोजगाराच्या प्रचंड संधी उपलब्ध होणार आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुख्यमंत्री शिंदे यांनी मुनावळे पर्यटन स्थळाच्या जागेची पहाणी केली आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. या वेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पुरुषोत्तम जाधव यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘शासनाच्या साहाय्याने चालू होत असलेल्या या पर्यटन स्थळाचा आर्थिक उन्नतीसाठी स्थानिक नागरिकांनी उपयोग करून घ्यावा. या परिसरात पर्यटनाच्या मोठ्या संधी आहेत. त्यामुळे कांदाटी खोर्यात आणखी पर्यटन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यातून स्थानिकांना त्यांच्या घराजवळ रोजगार मिळणार आहे. याचा लाभ स्थानिक आणि येणारे पर्यटक यांनाही होणार आहे. मुनावळे येथे स्कुबा डायव्हिंग, बनाना राईड, जेट स्की, हाऊस बोट, बोट क्लब यांसह पर्यटकांसाठी अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येत आहेत, तसेच यामध्ये सुरक्षेचा विचार करण्यात आला आहे. त्यासाठी निरीक्षण मनोरा, पर्यटकांसाठी चेंजिंग रूम या सोयीही असणार आहेत.’’
ग्रामस्थांच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी यांना सूचना देतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘मासेमारीसाठी अनुमती देण्यात यावी. जलाशयामध्ये मत्स्यबीज सोडावे. अतिरिक्त भू संपादन झालेल्या भूमींचा प्रश्न जिल्हाधिकार्यांनी विशेष शिबिर घेऊन मार्गी लावावा.’’ |