ज्ञानवापीच्या सर्वेक्षणासाठी जात असतांना सहस्रावधी मुसलमानांनी आमच्या गाडीला घातला होता घेराव !

  • ज्ञानवापी प्रकरणातील हिंदु पक्षाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी सांगितल्या आठवणी

  • इतिहासकार विक्रम संपत यांच्या आगामी पुस्तकात शब्दबद्ध होणार आठवणी !

अधिवक्ता विष्णु शंकर जैन व पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन

वाराणसी – न्यायालयाच्या आदेशानुसार वादग्रस्त ज्ञानवापीच्या सर्वेक्षणासाठी जात असतांना मी आणि माझे वडील सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांना वर्ष २०२२ मध्ये अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाचा निषेध करत ५० ते ६० सहस्र मुसलमानांनी त्यांच्या गाडीला घेराव घातला होता आणि तेव्हा मला असाहाय्य वाटले होते, असे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी ज्ञानवापीच्या सुनावणीला जात असतांनाच्या आठवणींना उजाळा देतांना सांगितले.

ज्ञानवापीच्या सुनावणीच्या वेळी अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी त्यांना आलेल्या त्रासदायक अनुभवांचे केलेले कथन इतिहासकार विक्रम संपत यांनी त्यांच्या काशीवरील आगामी पुस्तकात शब्दबद्ध करणार आहे. आनंद रंगनाथन् यांनी ५ नोव्हेंबर या दिवशी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्वीटर) वर मुलाखतीचा एक भाग प्रसारित केला.

काशी विश्‍वनाथ मंदिर-ज्ञानवापी वादाशी संबंधित खटल्यात अधिवक्ता विष्णु शंकर जैन आणि त्यांचे वडील सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन हे दोघे हिंदु बाजूचे प्रतिनिधित्व करत आहेत. वाराणसीतील वादग्रस्त ज्ञानवापीचे न्यायालयाच्या आदेशानुसार सर्वेक्षण आणि चित्रीकरण ज्या दिवशी केले जाणार होते, त्या दिवसाचा विस्तृत घटनाक्रम सांगतांना अधिवक्ता विष्णु शंकर जैन म्हणाले, ‘‘त्या दिवशीच्या आठवणी त्यांच्या ह्रदयात खोलवर कोरल्या गेल्या आहेत. तो ५ किंवा ६ मे २०२२ चा दिवस होता. त्या दिवशी ‘अंजुमन इंतेजामिया मशीद समिती’च्या सचिवांनी सांगितले की, ते ज्ञानवापीचे सर्वेक्षण आणि चित्रीकरण करू देणार नाहीत. त्यांच्या आवाहनावर ५० ते ६० सहस्र मुसलमान रस्त्यावर उतरले आणि त्यांनी वाराणसीच्या श्री काशी विश्‍वनाथ मंदिराचे प्रवेशद्वार क्रमांक ४ पर्यंतचे सर्व रस्ते अडवले. त्यांनी कवटीच्या टोप्या घातल्या होत्या आणि विशिष्ट पद्धतीने कपडे परिधान केले होते. मी आणि माझे वडील एका कारमधून प्रवेशद्वार क्रमांक ४ कडे जात होतो. क्षणभर आम्हाला वाटले की, ‘आम्ही ज्ञानवापीकडे कधीच पोचणार नाही. आमच्यावर आक्रमण केले जाईल आणि आम्हाला प्रवेशद्वार क्रमांक ४ पर्यंत पोचू दिले जाणार नाही.’ त्या वेळी मी माझ्या वडिलांकडे असाहाय्यपणे पाहिले. त्यांनी मला अगदी शांतपणे सांगितले की मृत किंवा जिवंत, आपण आपल्या महादेवाला भेटणार आहोत. त्यामुळे पुढे व्हा. तीच माझी प्रेरणा ठरली.’’ ते पुढे म्हणाले की, काही दिवसांनंतर ज्ञानवापी परिसरात केवळ शिवलिंगच सापडले नाही, तर या प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्वेक्षण पथकाने स्वस्तिक, नंदी आणि झानवापीच्या भिंतींवर कमळांमधे अनेक हिंदु देवतांचे आकृतीबंध आढळल्याचे सांगितले.

न्यायालयाकडून ज्ञानवापीचे सर्वेक्षण थांबवण्याचा आदेश !

मुसलमान जमावाने ज्ञानवापी सर्वेक्षण पथकाला आत प्रवेश करण्यापासून परावृत्त केल्याने न्यायालयाने ज्ञानवापीचे सर्वेक्षण थांबवण्याचा आदेश दिला. वाराणसीमध्ये दिवसभरासाठी सर्वेक्षण थांबवल्यानंतर सर्वेक्षण पथकासमवेत आलेल्या एका व्हिडिओग्राफरने स्वस्तिक, नंदी आणि कमळाच्या आकृतीबंधांसह हिंदु देवतांच्या प्रतिमा असल्याचे उघड केले. नंतर १६ मे या दिवशी सर्वेक्षण केले गेले आणि ज्ञानवापी वास्तूमध्ये शिवलिंग सापडले. १६ मे या दिवशी ज्ञानवापी वास्तूमध्ये शिवलिंग सापडल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकार्‍यांना पवित्र वास्तूचे संरक्षण करण्याचे निर्देश दिले.

अलाहाबाद उच्च न्यायालयाने ३ ऑगस्ट २०२३ या दिवशी भारतीय पुरातत्व विभागाच्या ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाला आव्हान देणारी अंजुमन इंतेजामिया मशीद समितीची याचिका फेटाळून लावली आणि भारतीय पुरातत्व विभागाला ज्ञानवापीचे सर्वेक्षण करण्याची अनुमती दिली.