गाझामधील मुलांचे दुःख समजून घेतांना पाकिस्तानमधील हिंदूंचेही दुःख समजून घ्या ! – दानिश कनेरिया, माजी क्रिकेटपटू, पाकिस्तान

पाकिस्तानचा हिंदु धर्मीय माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया याने भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याला सुनावले !

डावीकडून दानिश कनेरिया आणि इरफान पठाण

इस्लामाबाद / नवी देहली – हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धात दोन्ही बाजूंकडील मुलांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलकडून गाझा पट्टीमध्ये करण्यात येत असलेल्या आक्रमणांमध्ये तेथे ३ सहस्रांहून अधिक मुलांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. यावरून भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान खान याने ट्वीट करतांना म्हटले होते, ‘गाझामध्ये प्रतिदिन नवजात अर्भकापासून १० वर्षांच्या निरपराध मुलांचा मृत्यू होत आहे आणि जग शांत आहे. एक खेळाडू या नात्याने मी केवळ आवाज उठवू शकतो; मात्र अती झाले आहे. जगभरातील नेत्यांनी एकत्र येऊन मृत्यूच्या चक्राला थांबवले पाहिजे.’ (७ ऑक्टोबरला हमासने इस्रायलवर आक्रमण करून दीड सहस्र लोकांना ठार केले, २४० जणांना ओलीस ठेवले, ज्यात मुले, महिला आणि वृद्धही आहेत. त्यांच्याविषयी इरफान पठाण याला बोलावेसे का वाटले नाही ?, हे त्याने सांगायला हवे ! – संपादक) या ट्वीटवरून पाकिस्तानचा हिंदु धर्मीय माजी क्रिकेट खेळाडू दानिश कनेरिया याने पठाण याला हिंदूंविषयी बोलण्याचीही आठवण करून दिली आहे. दानिश कनेरिया याने म्हटले आहे, ‘इरफान भाऊ, मी आनंदी आहे की, तुम्हाला गाझामधील मुलांचे दुःख समजले. यासाठी मी तुमच्या समवेत उभा आहे; मात्र कृपा करून पाकिस्तानी हिंदूंविषयी बोला. पाकिस्तानमधील स्थिती गाझापेक्षा वेगळी नाही.’ इरफान पठाण याच्या ट्वीटवरून अनेकांनी त्याच्यावर टीका केली आहे.

संपादकीय भूमिका 

पाकिस्तानमधील सोडा भारतातील हिंदूंचे दुःख भारतातील क्रिकेट किंवा अन्य क्रीडा प्रकारातील हिंदु खेळाडू कधी समजून घेत नाहीत कि त्यांच्यासाठी उभे रहात नाहीत, हे हिंदूंचे दुर्दैव ! ज्या खेळाडूंना हिंदू डोक्यावर घेतात, त्यांना ‘क्रिकेटचा देव’ही समजतात, असे खेळाडू कधी पीडित हिंदूंसाठी विशेषतः काश्मिरी हिंदूंसाठी एक शब्दही बोलत नाहीत !