अमेरिकेत अवैध पद्धतीने घुसलेल्या ९७ सहस्र भारतियांना एका वर्षात अटक केल्याचा दावा !

  • (म्हणे) ‘या लोकांना भारतात रहाण्याचे भय !’ – अमेरिकी खासदार जेम्स लँकफोर्ड

  • गेल्या १० वर्षांत अवैध रूपाने आलेल्या भारतियांच्या संख्येत १०० पटींची वाढ !

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेत अवैध पद्धतीने घुसलेल्या जवळपास ९७ सहस्र भारतियांना अटक करण्यात आली आहे. ही आकडेवारी ऑक्टोबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ या एका वर्षातील असल्याचा दावा ‘यूएस कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन डेटा’ या अमरिकी संस्थेने केला. या आकडेवारीनुसार अटक करण्यात आलेल्या ९६ सहस्र ९१७ भारतियांपैकी ३० सहस्र १० भारतीय अमेरिका-कॅनडा सीमामार्गे अमेरिकेत घुसले, तर ४१ सहस्र ७७० भारतीय अमरिका-मेक्सिको सीमेवरून आत आले. त्यांना आत येतांनाच अटक करण्यात आल्याचा दावा या संस्थेने केला आहे.

सौजन्य विऑन 

१. अमेरिकी संसदेत खासदार जेम्स लँकफोर्ड यांनी दावा केला की, या भारतियांना त्यांच्या देशात रहाण्याचे भय वाटते. त्यामुळे ते भारत सोडून अमेरिकेत येत आहेत.

२. अमेरिकी प्रसारमाध्यम ‘वॉल स्ट्रीट जर्नल’नुसार भारतात होणार्‍या राजकीय आणि  धार्मिक जाचामुळे भारतीय नागरिक अमेरिकेत मोठ्या प्रमाणात येऊ लागले आहेत. यासह भारतात आर्थिक संधी अल्प असणे, हेही ते अमेरिकेत येण्यामागील एक मोठे कारण आहे. वर्ष २०१२ ते २०२२ या १० वर्षांची तुलना केली, तर हे प्रमाण १०० पटींनी वाढले आहे.

३. ‘न्यू अमेरिकन इकॉनॉमी’ या बुद्धीजीवी संस्थेच्या म्हणण्यानुसार अमेरिकेत एकूण १ कोटी अवैध प्रवासी रहात असून त्यांपैकी ६ लाख भारतीय आहेत.

४. अमेरिकेतील कारागृहांत २० सहस्रांहून अधिक भारतियांना अवैध पद्धतीने बंद करण्यात आले असून त्यांच्याकडून बलपर्वूक मजुरी करवून घेतली जात आहे. या माध्यमातून कारागृहे चांगली कमाई करतात; परंतु बंदीवानांना योग्य पगार देत नाहीत. मजुरी करण्यास मनाई केल्यावर त्यांना अंधार्‍या कोठडीत डांबण्यात येते.

संपादकीय भूमिका 

अशी आकडेवारी आणि त्यामागील कारण सांगून भारताची प्रतिमा मलिन करण्याचा हा डाव नसेल कशावरून ?