‘मी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात एका सेवेसाठी गेले होते. आश्रमातून घरी जाण्यापूर्वी मी स्वागतकक्षातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राला नमस्कार करते. त्या वेळी मला आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. ९.११.२०२२ या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राला नमस्कार करतांना
१ अ. प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राला नमस्कार करतांना निर्विचार स्थिती अनुभवणे आणि स्वतःचे अस्तित्व न जाणवणे : ‘९.११.२०२२ या दिवशी मी रामनाथी आश्रमातून घरी निघण्यापूर्वी नेहमीप्रमाणे प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राला नमस्कार करण्यासाठी डोळे मिटून उभी राहिले. एरव्ही मी प.पू. भक्तराज महाराज यांना ‘प.पू. बाबा कृतज्ञ आहे’, असे म्हणते. त्या दिवशी मात्र मी डोळे मिटल्यावर काही म्हटले नाही. मी निर्विचार स्थिती अनुभवली. मला माझे अस्तित्व जाणवत नव्हते. त्या स्थितीतून बाहेर पडतांना मला प्रयत्नपूर्वक डोळे उघडावे लागले.
१ आ. उजवीकडे पाहिल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ दिसणे, त्यांनी साधिकेची विचारपूस करणे आणि ‘त्यांच्या अस्तित्वामुळे निर्विचार स्थिती अनुभवता आली’, याची साधिकेला जाणीव होणे : मी त्याच स्थितीत मान वळवून उजवीकडे पाहिले. तेव्हा मला दिसले, ‘तेथे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ उभ्या आहेत.’ त्या माझ्याकडे पाहून हसल्या आणि त्यांनी माझी विचारपूस केली. तेव्हाही माझे मन पूर्णत: निर्विचार होते. आजपर्यंत मी अशी स्थिती कधी अनुभवली नव्हती. काही वेळानंतर मला जाणीव झाली की, ‘मी नमस्कार करत असतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ माझ्या बाजूला उभ्या होत्या. त्यांच्या केवळ अस्तित्वामुळे मला ही स्थिती अनुभवता आली.’
१ इ. ‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ति चारी साधियेल्या ।’ या संत वचनाची अनुभूती येणे : एकदा सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सत्संगात सांगितले, ‘‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ति चारी साधियेल्या ॥’ म्हणजे देवाच्या दारापाशी मनुष्य क्षणभर जरी उभा राहिला, तरी चारही मुक्ती साधल्याप्रमाणे आहे’, असे संत ज्ञानेश्वर महाराज यांचे वचन आहे. येथेे ‘देवाच्या दारी नुसते उभे रहाणे’ संत ज्ञानेश्वर महाराज यांना अभिप्रेत नाही, तर स्वतःचे अस्तित्व विसरून देवाच्या दारी उभे रहायला हवे.’’ श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या केवळ अस्तित्वानेच मला गुरुदेवांनी सांगितलेल्या या वचनाची प्रचीती घेता आली.
२. दुसर्या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राला नमस्कार करतांना
अ. दुसर्या दिवशी आश्रमातून निघतांना मी नमस्कार करण्यासाठी प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रासमोर उभी राहिले. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘आजही मला कालच्याप्रमाणे निर्विचार स्थिती अनुभवता येते का ?’, ते पाहूया.’
आ. त्यानंतर मी डोळे मिटून नमस्कार केला. तेव्हाही मला कालच्याप्रमाणे अनुभूती आली. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ येथेच कुठेतरी असतील. त्यामुळे मला आजही ती अनुभूती आली.’
इ. मी सभोवताली पाहिले. तेव्हा मला दिसले, ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ स्वागतकक्षाच्या दाराजवळ भ्रमणभाषवर बोलत आहेत.’ तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘त्यांच्या अस्तित्वामुळेच मला पुन्हा ती दैवी अनुभूती आली.’
‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या कृपेनेे मला जी आध्यात्मिक स्थिती अनुभवता आली’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करते.’
– अश्विनी कुलकर्णी, फोंडा, गोवा. (२०.११.२०२२)
‘या सूत्रांचे टंकलेखन करतांना मला संगणकाच्या पडद्यावर सप्तरंगांच्या प्रकाशलहरी दिसल्या.’ – अश्विनी कुलकर्णी, फोंडा, गोवा. (२०.११.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |