दोडामार्ग – तालुक्यात न्यायालयाने वृक्ष तोडण्यावर संपूर्णत: बंदी घातली आहे. असे असतांना तालुक्यात न्यायालयाच्या आदेशाचा भंग करून अनेक ठिकाणी वन विभागाच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात वृक्षतोड चालू आहे. याच्या विरोधात वन विभागाने तातडीने कारवाई केली नाही, तर मुख्य वनसंरक्षक नागपूर यांच्याकडे तक्रार करणार, तसेच न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) करणार असल्याचे स्थानिक भूमीदार फ्रान्सिस लोबो यांनी सांगितले.
लोबो यांनी सांगितले की, पाळये गावात ‘गेल’ आस्थापनाच्या गॅसवाहिनीला लागून असलेल्या कित्येक एकर भूमीत केरळमधील लोकांनी झाडे तोडली आहेत. सर्वसामान्य शेतकर्यांनी झाडे तोडली, तर कायद्याचा बडगा दाखवला जातो; पण गेल्या काही वर्षांपासून दोडामार्ग तालुक्यात सरसकट वृक्षतोड बंदी असतांना परप्रांतीय लोक डोंगर सपाटीकरण करण्याच्या नावाखाली सहस्रो झाडे तोडत आहेत. यामुळे वन्यप्राणी लोकवस्तीमध्ये येऊन लागले आहेत. याला सर्वस्वी वन विभाग उत्तरदायी आहे. याविषयी संबंधित तक्रारदाराने दोडामार्ग वन विभाग कार्यालयात २ एप्रिल या दिवशी लेखी तक्रार दिली आहे; पण आठवडा झाला, तरी वन विभागाकडून संबंधित परप्रांतीय केरळीयन लोकांची पाठराखण केली जात आहे. याच्या विरोधात न्यायालयात जाणार आहोत.