कतारमधील ८ निवृत्त नौदल अधिकार्‍यांच्या सुटकेसाठी भारत तुर्कीयेचे साहाय्य घेण्याच्या सिद्धतेत !

कतारचे शेख तमीम बिन हमाद व पंतप्रधान मोदी

दोहा (कतार) – कतार देशामध्ये भारताचे ८ निवृत्त नौदल अधिकारी आणि कर्मचारी यांना हेरगिरीच्या प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांच्या सुटकेसाठी भारताकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. या संदर्भात तुर्कीये भारताला साहाय्य करू शकतो का ? याची चाचपणी करण्यात येत आहे. तुर्कीये पाकिस्तानचा जवळचा मित्र असून त्याचे कतारशी चांगले संबंध आहेत.

तुर्कीयेचे कतारच्या शेख तमीम बिन हमाद अल थानी या शाही परिवाराशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे भारताकडून तुर्कीयेचा मध्यस्थीसाठी वापर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुसरीकडे भारत अमेरिकेशीही याविषयावर चर्चा करत आहे. अमेरिकेचे कतारशी चांगले संबंध आहेत. हे दोन्ही प्रयत्न अयशस्वी ठरले, तर पंतप्रधान मोदी स्वतः कतारचे शेख तमीम बिन हमाद यांच्याशी चर्चा करू शकतात. पंतप्रधान मोदी यांचे त्यांच्याशी वैयक्तिक चांगले संबंध आहेत.

कतार आणि भारत यांच्यात तणाव का ?

भारताशी कतारचे चांगले संबंध असले, तरी काही गोष्टींमुळे दोघांमध्ये तणाव निर्माण होत आहे. इस्रायल कतारचा शत्रू आहे, तर भारताचा मित्र आहे. ही मैत्री कतारला सहन होत नाही, तसेच भारताचे सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरात यांच्याशी चांगले संबंध निर्माण झाले आहेत. हेही कतारला सहन होत नाही; कारण कतार जिहादी आतंकवाद्यांचे समर्थन करतो. तालिबान, हमास आणि हिजबुल्ला यांचे आतंकवादी नेते कतारमध्ये येऊन रहात असतात. पाकिस्तानशीही कतारचे चांगले संबंध आहेत.