इस्रायलकडून तुर्कीयेच्या राष्ट्रपतींवर टीका
न्यूयॉर्क (अमेरिका) – साप तर सापच रहाणार, असे विधान इस्रायलचे संयुक्त राष्ट्रांतील राजदूत गिलाड एर्दान यांनी तुर्कीयेचे राष्ट्रपती तैयप एर्दोगॉन यांना उद्देशून केले. तसेच इस्रायलने तुर्कीयेमधील त्याच्या दूतावासातील सर्व अधिकार्यानां माघारी बोलावण्याचाही निर्णयही घेतला आहे. राष्ट्रपती एर्दोगॉन यांनी तुर्कीयेतील इस्तंबुल येथे पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ आयोजित सभेमध्ये ‘इस्रायलला ‘युद्ध गुन्हेगार’ ठरवण्याची सिद्धता करत आहेत. इस्रायल गेले २२ दिवस युद्ध करून अपराध करत असतांना पाश्चात्त्य देशांचे नेते त्यावर मौन बाळगून आहेत. ते युद्धविराम करण्यासही सांगत नाहीत’, असा आरोप एर्दोगॉन यांनी केला. इस्रायलकडून गाझा पट्टीवर करण्यात येणार्या आक्रमणांचा ‘नरसंहार’ असाही उल्लेख त्यांनी केला होता.
आम्ही जगातील सर्वाधिक नीतीमत्ता पाळणारे सैन्य ! – बेंजामिन नेतान्याहू
एर्दोगॉन यांच्या आरोपांवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी प्रत्युत्तर देतांना म्हटले की, जर तुम्ही आमच्या सैनिकांवर युद्ध गुन्हेगाराचा आरोप करत असाल, तर हे ढोंग आहे. इस्रायलचे सैन्य जगात सर्वाधिक नीतीमत्ता पाळणारे सैन्य आहे.