अमली पदार्थ विरोधी जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीने नशामुक्ती केंद्र चालू करावे ! – जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह

अमली पदार्थ विरोधी जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती

रत्नागिरी – जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकार्‍यांनी नशामुक्ती केंद्र चालू करण्याविषयी पुढाकार घ्यावा, उपविभागीय अधिकार्‍यांनी तडीपारसह अन्य प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावीत, अशी सूचना जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह यांनी दिली.

एन्.सी.ओ.आर्.डी. अर्थात् अमली पदार्थ विरोधी जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक आज घेण्यात आली. या बैठकीला पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्याकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते आणि सर्व उपविभागीय अधिकारी, पोलीस उपअधीक्षक दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी एम्. देवेंदर सिंह म्हणाले की, उपविभागीय अधिकार्‍यांनी शाळा, महाविद्यालये यांमध्ये राबवलेल्या प्रचार, प्रसार, जनजागृती कार्यक्रमांचा अहवाल सादर करावा. गर्दीच्या ठिकाणी विशेषत: बसस्थानक, बाजारपेठ, प्रमुख चौकात मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी. ‘कोस्टगार्ड’नेही किती बोटी तपासल्या याविषयीची माहिती द्यावी.

पोलीस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले, ‘‘अन्न व औषध निरीक्षकांच्या साहाय्याने पोलिसांनी एम्.आय.डी.सी.मध्ये तपासणी केली आहे. अमली पदार्थाचे उत्पादन होत असल्यास तात्काळ कळवावे. अशा सूचनाही लोटे एम्.आय.डी.सी.मधील उद्योजकांच्या बैठकीत दिल्याचे सांगितले. पोलिसांनी केलेल्या ७ प्रकरणांत १४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.