|
नाशिक – येथे अमली पदार्थांच्या प्रकरणात ललित पाटील याला अटक झाली. वर्ष २०२० मध्ये तो उद्धव ठाकरे यांचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले. कदाचित् तो अजूनही असेल. त्याच्या हातात अद्यापही शिवबंधन असल्याची छायाचित्रेही प्रसिद्ध झाली आहेत. त्याच्या चौकशीत आणखी ७ ते ८ नावे समोर आली. त्यात सलमान फाळके हे नाव होते. त्याच्याकडे ५४ ग्रॅम ‘एम्.डी.’ हे अमली पदार्थ सापडले. सलमान फाळके याची ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते शानू पठाण, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमवेत काढलेली छायाचित्रे आढळली आहेत. शिवसेनेच्या मंत्र्यांवर ऊठसूठ बेछूट आणि तथ्यहीन आरोप करणारे जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळे यांनी अमली पदार्थ प्रकरणातील एका आरोपीसमवेत छायाचित्रे कशी काढली ? त्या आरोपीशी त्यांची कशासाठी जवळीक आहे ? याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी शिवसेनेच्या सचिव आणि प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांनी २५ ऑक्टोबर या दिवशी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
त्या पुढे म्हणाल्या, ‘‘हे आरोपी कुणाच्या जवळचे आहेत ? यांना कुणाचे अभय आहे ? यांचाही शोध घेऊन कारवाई व्हायला हवी. महाराष्ट्रात अमली पदार्थांसारख्या गोष्टी वाढत असतील, तर त्यांना वेळीच आळा घालायला हवा.’’