पणजी, २५ ऑक्टोबर (वार्ता.) : गोवा सरकारला गोव्याशी निगडित महत्त्वाची मूळ पोर्तुगीज कागदपत्रे पोर्तुगालमधून गोव्यात आणायची आहेत. त्याकाळी गोव्यातील तत्कालीन पोर्तुगीज शासन छत्रपती शिवाजी महाराज गोव्यात टाकत असलेल्या प्रत्येक पावलाविषयीची माहिती पोर्तुगाल शासनाला पत्राद्वारे कळवत होते. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांसंबंधी अनेक कागदपत्रे आम्हाला मिळणार आहेत. गोवा सरकार गोव्याला पाहिजे असलेल्या कागदपत्रांची सूची सिद्ध करत आहे आणि यासाठी यापूर्वी पोर्तुगालमध्ये जाऊन या विषयावर संशोधन केलेल्यांशी गोवा सरकार संपर्क करत आहे, अशी माहिती पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली. (गोवा मुक्तीनंतर गेल्या ६२ वर्षांत अशी ऐतिहासिक कागदपत्रे कुठल्याच शासनाने का आणली नाहीत ? – संपादक)
(सौजन्य : Goa Today 24×7 News)
मंत्री सुभाष फळदेसाई पुढे म्हणाले,
‘‘पोर्तुगालकडून पाहिजे असलेल्या कागदपत्रांची सूची सिद्ध झाल्यानंतर गोवा सरकार केंद्रशासनाच्या माध्यमातून पोर्तुगालच्या शासनाला संपर्क करणार आहे. गोव्याशी संबंधित कागदपत्रे गोव्याला मिळाली पाहिजेत. याद्वारे अनेक गुपिते उघड होणार आहेत.’’
यापूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याशी निगडित महत्त्वाची मूळ पोर्तुगीज कागदपत्रे पोर्तुगालमधून आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधण्याची सूचना मंत्री सुभाष फळदेसाई आणि पुरातत्व खात्याचे संचालक यांना केली होती.